रत्नागिरी: महायुतीने सन्मानजनक जागा न दिल्यामुळे राजापूर व लांजा वगळता आम्हाला महायुतीतून बाहेर पडावे लागले, असे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष बंटी वणजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुसर्या बाजुला राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) सुद्धा एक गट महाआघाडीतून बाजूला होऊन अजितदादा गटाला मिळाला आहे. यामुळे रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सध्या नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सध्या सर्वत्र आघाडी व युतीमध्ये बिघाडी झालेली दिसत आहे. रत्नागिरीत सुद्धा हे चित्र आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बंटी वणजू यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
महायुतीत आम्हाला सन्मानजनक जागा वाटप झाले नाही. लांजा, राजापूर वगळता अक्षरशः राष्ट्रवादीच्या तोंडाला पाने पुसण्या त आली ,असा आरोप वणजू यांनी केला. रत्नागिरीत स्वतंत्र चूल मांडण्यात आली असून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत, असे वणजू यांनी जाहीर केले. तसेच सध्या फेक नरेटिव्ह न्यूज पसरवण्यात आल्या आहेत. त्यांना माझे एकच म्हणणे आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे, असा टोला वणजू यांनी लगावला आहे.
या पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचे बशिर मुर्तुझा हेही उपस्थित होते. उबाठाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे आम्ही काही पदाधिकार्यांना घेऊन महाआघाडीतून बाहेर पडलो आहोत. आता घड्याळ या चिन्हावर आपण निवडणूक लढवत आहोत, असे मुर्तुझा यांनी सांगितले.