जालगाव : दापोली तालुक्यात उन्हवरे येथे किरकोळ वादातून सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. विनोद गणपत तांबे (रा. उन्हवरे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी (दि. 19) मध्यरात्री हा खून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. रवींद्र गणपत तांबे (रा. उन्हवरे) असे संशयिताचे नाव आहे. दापोली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी भावकीसोबत बैठक झाली. या बैठकीत ज्याचा खून झाला त्या विनोदने रवींद्र याला काही अपशब्द बोलले होते. त्याचाच राग मनात धरून रात्री वाद झाला आणि याच वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने, पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संशयित रवींद्र याला ताब्यात घेण्यात आले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे.