खेड : येथील पंचायत समिती कार्यालयाने दिव्यांगस्नेही बनण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, दृष्टिहीन नागरिकांसाठी ब्रेल लिपीत माहिती फलक लावणारी कोकणातील पहिलीच पंचायत समिती ठरली आहे. गुरुवारी दि.15 रोजी सायंकाळी या फलकाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकाचे उद्घाटन स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडीच्या प्राचार्या प्रतिभा सेनगुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी या विद्यालयातील दृष्टिहीन विद्यार्थिनीने स्वतः ब्रेल लिपीतील माहिती वाचून उपस्थितांची मने जिंकली.
या वेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, सहाय्यक प्रशासन अधिकारी परशुराम इचुर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनुश्री आंब्रे, आरोग्य विस्तार अधिकारी नरेश ईदाते, कृषी विस्तार अधिकारी गावडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत तो राज्यातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. खेड पंचायत समितीने दाखवलेले हे पाऊल दृष्टिहीन बांधवांसाठी सरकारी सेवा अधिक सुलभ करणारे ठरणार आहे.