रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील Pudhari
रत्नागिरी

Maharashtra Karnataka Border Dispute | सीमा प्रश्नी भाषण प्रकरण; २० वर्षांनंतर रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील निर्दोष

खानापूर न्यायालयाचा पुराव्याअभावी निर्णय; २००६ मधील भाषण प्रकरणाला अखेर पूर्णविराम

पुढारी वृत्तसेवा

Khanapur Court Decision Shiv Sena Leaders Acquitted

खेड : बेळगाव, धारवाड, निपाणी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी २००६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात केलेल्या भाषणप्रकरणी दाखल असलेल्या खटल्याचा तब्बल २० वर्षांनंतर निकाल लागला. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मंगळवारी (दि. ११) न्यायालयाने हा निकाल दिला.

२००६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून बेळगाव परिसरातील वातावरण तापलेले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते उपस्थित होते. तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी मेळाव्यात सहभागी होत सीमाप्रश्नावर भूमिका मांडली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आल्याचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

या भाषणांप्रकरणी खानापूर पोलिसांनी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ आणि १५३-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू झाली. मात्र, विविध कारणांमुळे हा खटला तब्बल दोन दशके सुरू राहिला.

न्यायालयात हजर न राहिल्याने वॉरंट

खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी यांनी न्यायालयात जामीनदार म्हणून भूमिका बजावली. त्यानंतर रामदास कदम यांना १० लाख रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्यात आले होते.

तब्बल २० वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणातील सुनावणी अखेर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्ध पुरेसा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद केले. त्यानुसार रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. शामसुंदर पत्तार आणि अॅड. हेमराज बेंच्चन्नावर यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निकालामुळे दोन दशकांपासून सुरू असलेल्या सीमा प्रश्नाशी संबंधित या खटल्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT