रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील सागवे गावामध्ये सागवे येथील कारीवणे चांदवण भागात काळा बिबट्याचा वावर दिसून आला असून, एका घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्याला मारून हा बिबट्या घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याला पकडून दूर जंगलात सोडावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
सागवे येथे राहणार्या राकेश रामदास भोसले यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्ये हा काळा बिबट्या दिसून आला आहे. रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अंगणामध्ये एक कुत्रा फिरत असताना कुत्र्याला या काळ्या बिबट्याने पकडून जंगलात पळ काढल्याचे दिसून येत आहे. सागवे गाव परिसरात काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले असून, भविष्यात सागवेमधील अन्य गोवंशीय प्राण्यांवर त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यताही ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली असून, या बिबट्याला पकडून लोकवस्तीपासून दूर दाट जंगलात सोडावे, अशी मागणी होत आहे.