रत्नागिरी जिल्हा परिषद pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri Politics : भाजपा कार्यकत्यांमध्ये हमरातुमरी

जिल्हा परिषदेसाठी एकही जागा न सोडल्यामुळे भाजपा कार्यकर्ते झाले संतप्त

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेने पंचायत समितीमध्ये फक्त दोन गण सोडले असून जिल्हा परिषदेसाठी एकही जागा न सोडल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकारी हमरातुमरीवर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना बैठक लवकर गुंडाळावी लागली. त्यामुळे भाजपला रत्नागिरीत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला बुधवारी शेवटचा दिवस आहे. शिवसेनेने जिल्ह्यात भाजपसोबत युती करत भाजपाला 7 तर पंचायत समितीमध्ये 19 जागा सोडल्या आहेत. मात्र रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी भाजपाच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही. पंचायत समितीमध्ये भाजपाला दोन गण सोडण्यात आले आहेत. काही वर्षांपर्यंत तालुक्यात काही गट व गण हे भाजपाचे बळस्थान होती. गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढली होती. त्यावेळी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र मागील काही वर्षांत राज्यात सत्ता आल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष घातल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये जोश वाढला असून भाजपाला जिल्ह्यात चांगले दिवस येऊ लागल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांची विकास कामेही रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढला आहे. मात्र सेना-भाजप युतीमध्ये रत्नागिरी तालुक्यात एकही जागा जिल्हा परिषदेत वाट्याला आली नाही. त्यातच पंचायत समितीमध्येही सेनेने दोन जागांवरच बोळवण केल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सोमवारी भाजपा दक्षिण जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक प्रभारी ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुवारबावसह पावस पंचक्रोशी, कोतवडे परिसरातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना दोनच पंचायत समितीच्या जागा मिळाल्यावरून धारेवर धरले. यावेळी कुवारबाव भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात राजिनामेही दिले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. एकदी हमरीतुमरीपर्यंत स्थानिक कार्यकर्ते आले होते. पदाधिकाऱ्यांवर नाना आरोपही यावेळी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT