चिपळूण शहर : शहरातील बहादूरशेखनाका राधाकृष्ण नगर येथे काही दिवसांपूर्वी चोरट्याने 9 सदनिका फोडून ऐवज लंपास केला आहे. तसेच खेंड भागात चोरीची घटना घडल्या आहेत. या चोरी प्रकरणाचा अजून उलगडा झाला नसून लवकरात लवकर या चोरीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी भाजपसह बहादूरशेखनाका राधाकृष्ण नगरमधील रहिवाशांसह भाजपच्या शिष्टमंडळाने चिपळूण पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी चिपळूण बहादूरशेखनाका येथील राधाकृष्ण नगरमध्ये नऊ सदनिका फोडीचे प्रकार घडले आहते. तसेच शर्मिला चंद्रकांत शिंदे यांच्याशी एकाने गोड बोलून हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आहेत. खेंड विभागात घरफोडी झाल्या आहेत. या चोर्यांचा अजून पर्दाफाश झालेला नाही. तरी लवकरच चोरट्यांना गजाआड करावे, अशी मागणी करतांना पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. तसेच चिपळूण नगर परिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.
पावसाळा सुरू झाला असून पुरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी व प्रत्येक पदाधिकार्यांनी आपल्या प्रभागातल्या समस्या मांडल्या. त्यावर लवकरात लवकर उपायोजना करण्यात येतील. याचबरोबर चिंचनाका, बाजारपेठ आदी भागात वाहतूक कोंडी होत असल्याने त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपा महिला आघाडी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विनोद सुर्वे, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद कदम, शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, विवेक गोखले , निखिल रतावा, तालुका उपाध्यक्ष संदीप सुगदरे, प्रफुल्ल पिसे, संदेश भालेकर, मंदार टोपरे, उदय घाग, परब, सुधीर पानकर, शुभम खंडजोडे, महेश शिंदे, निलेश पोसनाक, साहील भिसे, रामा कदम, श्रीराम खेतले, भरत जाधव, महेश कडगे, दिलीप राठोड उपस्थित होते.