साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे खालचीवाडी येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडलेल्या गव्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तगवारेडा विहिरीत पडल्यामुळे झालेल्या आवाजाने शेजारील लोक जमा झाले. त्यानंतर वन विभागाला या घटनेची खबर दिल्यावर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या क्रेनने मोठ्या जिकिरीने त्याला बाहेर काढले. गुरुवारी सकाळी 11.30 वा. पशुवैद्यकीय अधिकारी सोनाली शेटे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यावर व पंचनामा झाल्यावर नदीकिनारी गवारेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी संगमेश्वर तालुका वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक श्री. कराडे, सुरज तेली, आकाश कडुकर, श्री माळी ए. एम. यावेळी उपस्थित होते.
विहिरीची उंची सुमारे 30 फूट होती व विहिरीतील पाणी 10 ते 12 फूट होते. त्यामुळे तो काही काळ पाण्यावर तरंगत होता. घटनेवेळी पुर्ये खालचीवाडी व परिसरातील ग्रामस्थ वन विभागाच्या मदतीला आले होते. त्याचबरोबर पोलिस खात्याचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, काही काळानंतर थकल्याने व पाण्यावर तरंगू न शकल्याने गवा रात्री 10 च्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.