रत्नागिरी : मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात परतणारी गिलनेट नौका भगवती बंदर येथील ब्रेक वॉटर वॉलजवळ उलटून बुडाली. या नौकेतील 6 खलाशांनी पोहत येऊन किनारा गाढला. परंतु, दोन खलाशी समुद्रात बेपत्ता झाले. यातील विनोद धुरी (56, मूळ रा. गोवा) नामक खलाशाचा मृतदेह मिर्या बंदर किनार्याजवळ आढळून आला. दुसर्या एका मासेमारी नौकेच्या मदतीने सोमवारी सायंकाळी हा मृतदेह मिळाला. दुसरा खलाशी अनामुल तालुकदार अजून बेपत्ता आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली.
मिरकरवाडा येथे राहणार्या शब्बीर मजगावकर यांच्या मालकीची अमिना आयेशा नावाची गिलनेट मच्छीमार नौका रविवारी रात्री मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात परत येत होती. या नौकेत 8 खलाशी होते. समुद्रात जोरदार वार्यांमुळे उंच लाटा उसळत होत्या. नौका बंदराजवळच्या ब्रेक वॉटर वॉलजवळ आली असताना एका उंच लाटेच्या धडकेने उलटली आणि तेथेच बुडाली. दुर्घटनेनंतर दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासून इतर नौकांच्या मदतीने शोध सुरू झाला. सकाळी एक मृतदेह मिर्या समुद्रात तरंगत असल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आणि पोलिस मिर्या समुद्र किनारी दाखल झाले. नजरेसमोरच समुद्रात तरंगणारा मृतदेह लाटांच्या मार्याने पुढे पुढे येताना दिसत होता. काही वेळाने ओहोटी सुरू झाल्याने तो मृतदेह पुन्हा समुद्रात ओढला गेला. त्यामुळे हा मृतदेहच आहे, याची खात्री करण्यासाठी मत्स्य व्यवसायाच्या अधिकार्यांनी ड्रोनची मदत घेण्याचे ठरविले. परंतु मिर्या परिसर हा नो फ्लाय झोन असल्याने ड्रोन या ठिकाणी उडू शकला नाही.
पोलीस आणि मत्स्य व्यवसायाच्या अधिकार्यांनी अखेर दुसर्या एका मच्छिमार नौकेची मदत घेऊन तरंगताना दिसणारा मृतदेह किनार्यावर आणला. त्यावेळी तो मृतदेह बुडालेल्या अमिना आएशा नौकेवरील विनोद धुरी या खलाशाचा असल्याचे स्पष्ट झाले. दुसर्या बेपत्ता झालेल्या खलाशी अनामुल तालुकदार याचा मासेमारी नौकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. हा बेपत्ता खलाशी आसामचा आहे. दरम्यान समुद्रात अपघाताच्या ठिकाणी बुडालेली नौका बाहेर काढण्याचा प्रयत्नही करण्यात येत होता.