खेड: गेले सहा दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे सुरू असलेले कीर्तनकार भगवान कोकरे यांचे उपोषण सुरू होते. उपोषण स्थळी शनिवारी (दि.२३) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यांनी त्यांच्या मागण्या समजून घेत सर्व मागण्या तातडीने सोडवण्यात येतील असे सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाचा मान राखत कोकरे यांनी आमरण उपोषण स्थगित केले.
कीर्तनकार भगवान कोकरे यांनी गेल्या सहा दिवसांपासून लोटे येथील गो-शाळा परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी गो शाळेतील गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवत महाराष्ट्र गो सेवा आयोगातर्फे ३३ लाख ४५ हजारांचे अनुदान गो शाळेच्या संचालक संस्थेला अदा करण्यात आले. परंतु त्यानंतर देखील उर्वरित तीन मागण्यासाठी कोकरे यांनी उपोषण सुरू ठेवले होते. शनिवारी ना. उदय सामंत यांनी उपोषण स्थळी भेट दिली. गो शाळेची पाहणी केली. तत्काळ कृषी वीज जोडणी देण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. गो शाळेच्या जागेची समस्या सोडवण्यासाठी दोन दिवसांत बैठक लावणार असल्याचे सांगितले. तर संस्थेला शासनाकडून जाहीर करण्यात आलेले प्रलंबित पंचवीस लाख अनुदान तत्काळ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना ना.सामंत यांनी केल्या. यावेळी ना.सामंत यांनी भगवान कोकरे करत असलेल्या कार्याचे कौतुक करत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.