रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
बालविवाह हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे, ज्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात येते. त्यामुळेच महाराष्ट्राला बालविवाह मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत 'बालविवाह मुक्त महाराष्ट्र- आपला संकल्प' हे राज्यव्यापी अभियान सुरू असून, थांबा, विचार करा आणि कृती करा हा महत्त्वाचा संदेश यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी दिला.
सर्व शासकीय विभाग, धार्मिक नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांना एकत्र आणून महाराष्ट्राला बालविवाहमुक्त करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत 'बालविवाह मुक्त महाराष्ट्र- आपला संकल्प' या राज्यव्यापी अभियानांतर्गत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रत्नागिरीतर्फे नुकताच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालविवाह हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे, ज्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात येते.
अल्पवयीन गर्भधारणा आणि लैंगिक शोषणाला बळी पडण्याचे प्रमाण वाढते. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील काही भागांतील बालविवाहाच्या घटनांवर मात करण्यासाठी हे अभियान १४ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्यादिन) पासून सुरू झाले असून २६ जानेवारी २०२६ पर्यंत राबवले जात आहे.
हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्यांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनीही मार्गदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला परिविक्षा अधिकारी माळी, अॅड. संध्या सुखटणकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्रप्रशासक अश्विनी मोरे, महिला सक्षमीकरण केंद्र गेंडर स्पेशालिस्ट पवनकुमार मोरे, सखी सेंटरच्या समुपदेशक अॅड स्वरा मयेकर, केस वर्कर लता नंदिवाले, पॅरा मेडिकल ऑफिसर सुप्रिया शितप, आयटी स्टाफ प्रियांका बोरकर, महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्ष समुपदेशक पूर्वा सावंत, मानसी मोहिते तसेच मेघा विभुते आणि साक्षी साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.