रत्नागिरी: विविध पक्ष, सरकार तुम्हाला जाती-धर्मात अडकवत आहेत. जाती धर्मात अडकू नका, मी पक्षासाठी, जाती, धर्मासाठी काम करीत नाही तर मी दिव्यांग, शेतकरी, कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढतो. दिव्यांगांना अनुदान वाढवले असून आता 2500 हजार रुपये मिळत आहेत. दिव्यांगासाठी 6 हजार रुपये घेतल्याशिवाय थांबणार नाही. दोन पाय, हात नाही अशा दिव्यांगांसाठी कोणीच लक्ष देत नाही. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी सरकारवर केली. येत्या 28 ऑक्टोबर रोजी नागपूरला मोठे आंदोलन होणार असून यात मोठ्या संख्येने दिव्यांगसह विविध बांधवांनी उपस्थित राहवे, असेही आवाहन माजी मंत्री कडू यांनी केले.
दिव्यांग, शेतकरी, आंबा बागायतदार, मच्छीमार, कामगार यांच्याप्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी गडचिरोलीपासून हक्क यात्रा सुरू केली होती. यात्रेचा समारोप रत्नागिरी येथे सोमवारी स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात महासभा घऊन करण्यात आला. यावेळी माजी आमदार बाळा माने, हितेश जाधव, राजेंद्र कवनेरकर, बाळा साळवी, शैलेश कौस्तुरे, इम्रान सोलकर, अशोक होसकुडे यांच्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर येथील शेतकरी, दिव्यांग, बागायतदार, कामगार, मच्छीमार बांधव उपस्थित होते.
माजी मंत्री कडू म्हणाले, कोकणची भूमी नेहमीच प्रेरणा देणारी भूमी आहे. गडचिरोलीपासून हक्क यात्रेला सुरूवात केली होती. या यात्रेचा समारोप सोमवारी कोकणात होतोय. दिव्यांग बांधवाला अनुदान वाढावे म्हणून आंदोलन केले तर मुख्यमंत्र्यांनी एक हजार रूपये वाढविले. आता दिव्यांगांना 2500 हजार रूपये मिळत आहेत. बाकीचे राजकारणी तुम्हाला जाती-धर्मात अडकवत आहेत पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढून दिव्यांगांना न्याय देत असल्यामुळे दिव्यांगाचे मला आशीर्वाद मिळत आहे. पक्षावर निष्ठा ठेवू नका, तुमचे कधीच नसते, सत्ता भावा भावाला ओळखत नाहीत.
विधानसभेत ही दिव्यांगांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाहीत. मी सामान्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी लढाई लढतो. जाती, धर्माची लढाई लढलो असतो तर आता मी मंत्री असलो असतो असेही कडू म्हणाले. दिव्यांगाच्या प्रश्नासाठी 350 गुन्हे अंगावर घेतले, दिव्यांग बांधवाला अनुदान देत नाहीत. सरकारला लाजा वाटल्यापाहिजे. मुख्यमंत्र्यांनी 1 हजार रूपये अनुदान वाढवले तर 6 हजार रूपये घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार कडू यांनी महासभेत केला. यावेळी माजी आमदार बाळ माने, विविध बागायतदार, मच्छीमार, दिव्यांग बांधवांनी प्रानिधिक स्वरूपात आपली मनोगत व्यक्त केली.
हक्क यात्रेच्या कार्यक्रमास माजी मंत्री बच्चू कडू दुपारी 12 वाजता रत्नागिरीत येणार होते. मात्र तब्बल दोन तास उशिराने रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्ते, दिव्यांग, शेतकरी, कामगार, आंबा उत्पादक मोठ्या उशिरापर्यंत श्री कडू यांची वाट पाहत होती. 2 वाजता मारूती मंदिर येथे आल्यानंतर सावरकर सभागृहापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी दिव्यांग बांधव, कार्यकर्त्यांकडून एकच भिडू, बच्चू कडू, प्रहार संघटनेचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी गुलाबपुष्पांची वृष्टी करून माजी मंत्री कडू यांचे स्वागत करण्यात आले.