राजापूर : राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरात ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारचे प्रदूषणविरहित प्रकल्प बारसू, सोलगाव परिसरात आल्यास येथील जनता अशा प्रकल्पांचे स्वागत करेल, अशी भूमिका बारसू, सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी स्पष्ट केली आहे.
तालुक्यातील नाणार परिसरात यापूर्वी रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता; मात्र या प्रकल्पाला स्थानिक जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करून तो बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात हलवण्याच्या हालचाली शासनामार्फत सुरू होत्या. मात्र येथेही प्रदूषणकारी प्रकल्प म्हणून रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. तरीही, शासनाने वर्षभरापूर्वी बारसू परिसरात प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम पूर्ण केले होते; मात्र, त्याचा अहवाल अद्यापही जनतेसमोर आलेला नाही. त्यामुळे ऑटोमोबाईल हब उभारण्याच्या हालचालींबाबत अमोल बोळे म्हणाले, नाणार परिसरात प्रदूषणविरहित प्रकल्पांचे स्वागत आहे. राजापूर तालुक्यातील तरुणांचे स्थलांतर, बेरोजगारी सोडवण्यासाठी शासनाने बारसू परिसरात प्रदूषणविरहित प्रकल्प आणले तर शासनाला येथील जनतेचे सर्व सहकार्य राहील. अशा प्रकल्पांसाठी लागणारी जमीन देण्यासाठी येथील शेतकरी तयार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले..