रत्नागिरी : दिवाळी सणास सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असली, तरी नैसर्गिक फुलांचे दर आकाशाला भिडले आहेत. यंदा फुलांचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात फुलांची आवक जवळपास 50 टक्क्यांनी घटली आहे. कमी आवक आणि वाढलेल्या मागणीमुळे फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा पर्याय स्वीकारला असून घरात, कार्यालयात, दुकानात मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांचा दरवळ दिसून येत आहे.
रत्नागिरी शहर व तालुक्यातील बाजारपेठेत कृत्रिम फुलांपासून बनवलेल्या वस्तूंना मागणी आहे. हार, पुष्पगुच्छ, तोरण यासारख्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या वस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. फुलांच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांचा कृत्रिम फुलांच्या खरेदीवर भर आहे. शहरात अनेक विक्रेत्यांनी कृत्रिम फुलांच्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने उघडली आहेत. या वस्तूंचे दर तुलनेने कमी असल्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांना चांगली मागणी मिळत आहे. नैसर्गिक फुलांऐवजी घरोघरी, कार्यालये, दुकानात सजावटीसाठी लागणार्या कृत्रिम फुलांच्या माळा विविध आकारात बाजारपेठेत विक्रीस असून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.