राजापूर : शिलालेख, ढोपर विहिरीसह ऐतिहासिक ठेवा. pudhari photo
रत्नागिरी

अणुस्कुरा घाटातील ऐतिहासिक ठेवा जपणार

राजापुरातील पत्रकारांकडून पुरातन ठेवा संवर्धनासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूर बंदराच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणार्‍या अणुस्कुरा घाटातील श्री उगवाई मंदिराला व तेथून खाली येरडव मार्गे खाली येणार्‍या ऐतिहासिक पायवाटेला राजापूर पत्रकार संघाने भेट देऊन पाहणी केली. येथील पुरातन ठेव्याच्या संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे. राजापूर पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली.

राजापूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या येरडव गावच्या हद्दीत अणुस्कुरा घाटमाथ्यावर असलेले पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदिर आणि ऐतिहासिक शिलालेख नुकताच प्रकाझोतात आला आहे. जीर्णावस्थेत असलेला हा राजापुरातील ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा व मंदिराचे संवर्धन व्हावे. त्यासोबतच पर्यटनाच्या द़ृष्टीने या भागाचा विकास व्हावा, यासाठी राजापूर पत्रकार संघाने पुढाकार घेत नुकतीच या परिसराला भेट देत याच्या संवर्धनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला. या मंदिराचे संवर्धन आणि परिसराचे सुशोभिकरण झाल्यास भविष्यात या परिसरात माविकांसह पर्यटकांचाही ओढा वाढणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यात अनेक ऐतिहासिक खुणा आहेत. त्यापैकीच एक येरडव येथील श्री उगवाई देवीचे मंदिर, रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने या मंदिरासह शिवकालीन पायवाटेची स्वच्छता केली. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा प्रकाशझोतात आला आहे. फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार कि.मी.च्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेवर अणुस्कुरा घाटात राजापूर कोल्हापूर सीमेवर श्री उगवाई देवीचे मंदिर असून या मंदिरालगतच मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख व सतत वाहणारा पाण्याचा झरा असा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टीक्षेपात आला आहे.

शिवकाळामध्ये रहदारी असलेली आणि सद्यस्थितीमध्ये बंद होवून दुर्लक्षित राहिलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मोघल सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते.

या पायवाटेवरील चेक नाकाच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. नंतरच्या काळात मलकापूर, कोल्हापूर येथून कोकणात येण्यासाठी या पायवाटेचा वापर केला जात असल्याचेही जाणकार सांगतात.

कालांतराने अणुस्कुरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे पेरडव अणुस्कुरा ही पायवाटही बंद झाली. दरम्यान, राजापूर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच या ऐतिहासिक मंदिराला भेट देत येथील परिसराची पाहणी केली.

ज्या दिशेने सूर्य उगवतो त्याच दिशेला म्हणजेच राजापूर तालुक्याच्या पूर्व दिशेला हे मंदिर असल्याने या मंदिराला उगवाई देवी मंदिर असे म्हटले जात असल्याची एक दंतकथा प्रसिध्द आहे तर पांडवानी अज्ञातवासात असताना या मंदिराची उभारणी केल्याचीही काही भाविकांची श्रध्दा आहे. इथे असणारी ढोपर विहिर ही भिमाने आपल्या पायाचे ढोपर मारुन तयार केल्याची दंतकथाही या परिसरात ऐकावयास मिळते. या दंतकथा असल्या तरी ज्यावेळी राजापूर बंदराला दख्खनचे प्रवेशद्वार म्हणुन जगाच्या पाठीवर ओळखले जात होते त्यावेळी या मार्गाचा म्हणजेच पायवाटेचा व्यापारासाठी वापर होत असल्याचे अनेक उल्लेख इतिहासात पहावयास मिळतात. शिवकाळात या पायवाटेने राजापूर बंदरात येणार्‍या मालाची ने आण करण्यासाठी बैलांचा वापर करुन ही पायवाट वापरली जात होती.

लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणार

हा ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरणप्रकल्प अन् निसर्गसौंदर्य अनुभवता येते. त्यामुळे भविष्यामध्ये या स्थळाचा विकास झाल्यास शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी टेकर्सची पावले इकडे वळतील, यासाठी मंदिराचे संवर्धन व्हावे, तसेच हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा, याकरिता पत्रकार संघाच्यावतीने रत्नागिरी व कोल्हापूरचे पालकमंत्री, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी व प्रा. विकास पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT