राजापूर : मागील काही महिने वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या अणुस्कुरा घाटात बुधवारी कार सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात मयत व्यक्तीचे नाव कौस्तुभ विजय कुरूप (वय 30, रा. लांजा) असे आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार मयत कौस्तुभ हा आपल्या कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता. मंगळवारी (दि. 3) तो आपल्या गावी येत असताना अणुस्कुरा घाटात त्याच्या कारला भीषण अपघात घडला आणि काही क्षणातच गाडी बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली. अपघातग्रस्त गाडीची पुरतीच चाळण झाली होती. घटनास्थळी गाडीचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत होते. गाडीचे इंजन तर खाली रस्त्यावर येऊन पडले होते. मयत कौस्तुभचे पार्थिव एका बाजूला जाऊन पडले होते. घाटातील धुक्यामुळे अपघाताचा तसा कुणालाच अंदाज आला नाही.
दरम्यान, घाटमार्गे प्रवास करणार्या एका प्रवाशाला रस्त्यावर पडलेले इंजीन आढळून आल्यामुळे त्याने अणुस्कुरा घाटातील चेक पोस्ट वर असलेल्या पोलिसांना त्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे अणुस्कुरा चेक पोस्टवरील पोलिसांनी घाटात जाऊन पहाणी केली असता त्यांना झालेल्या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, लांजाचे पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे आपापल्या कर्मचार्यांसह अणुस्कुरा घाटात दाखल झाले.
स्थानिक ग्रामस्थ देखील अपघाताचे वृत्त समजताच धावून आले. मयत कौस्तुभचा मृतदेह दरीतून वर काढण्याचे काम सुरु होते. याचदरम्यान पडत असलेल्या पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. अपघातात कौस्तुभ कुरूप याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटना घडलेल्या अणुस्कुरा घाटाकडे धाव घेतली.
कौस्तुभ याने 5 मे 2025 रोजी रत्नागिरी येथे नोंदणी पद्धतील विवाह केला होता. 3 जून 2025 रोजी विधी परंपरेनुसार साखरपुडा करून 4 जून 2025 रोजी विवाह करणार होता. मात्र, तो 3 जून रोजी कुटुंबीयांना कोणतीच माहिती न देता आपल्या ताब्यातील कार (एम. एच. 08, ए. एक्स. 6155) घेऊन अचानक निघून गेल्याची फिर्याद कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार लांजा पोलिस ठाण्यात कौस्तुभ हा बेपत्ता असल्याची नोंदही करण्यात आली होती.