Amla Farming | शेतकर्‍यांसाठी आवळा शाश्वत उत्पन्न मार्ग Pudhari Photo
रत्नागिरी

Amla Farming | शेतकर्‍यांसाठी आवळा शाश्वत उत्पन्न मार्ग

जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पर्याय; आवळा प्रक्रिया उद्योगांना संधी निर्माण

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंदे

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक फळपिकांबरोबरच आवळा या पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढल्यास शेतकर्‍यांसाठी नव्या शेतीचे प्रतीक ठरेल. औषधी गुणधर्म, आयुर्वेदातील महत्त्व तसेच प्रक्रिया उद्योगातील वाढती मागणी यामुळे आवळा पीक शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरत आहे. जिल्ह्यात अद्याप मोठ्या प्रमाणावर व्यापारी लागवड झालेली नसली तरी काही तालुक्यांमध्ये प्रायोगिक आणि बागायती स्वरूपात आवळ्याची लागवड वाढू लागली आहे.

कमी पाण्यावर तग धरू शकणारे आणि विविध जमिनींमध्ये वाढणारे पीक म्हणून आवळ्याची ओळख आहे. कोकणातील हवामान आणि माती आवळ्यास पूरक आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, एकदा स्थिरावल्यानंतर आवळ्याचे झाड 30 ते 40 वर्षे उत्पादन देते. साधारणपणे 7 ते 8 वर्षांनंतर झाड पूर्ण उत्पादनात येते आणि एका झाडापासून दरवर्षी 40 ते 80 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते.

जिल्ह्यात आवळा प्रक्रिया उद्योगांची संख्या मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य दर मिळण्यात अडचणी येतात. प्रक्रिया उद्योग, साठवणूक सुविधा आणि थेट बाजारपेठ उपलब्ध झाल्यास आवळा पीक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात.

जिल्हास्तरावर आवळा लागवडीची स्वतंत्र व अद्ययावत आकडेवारी उपलब्ध नसणे ही मोठी अडचण आहे. कृषी व फलोत्पादन विभागाने तालुकानिहाय लागवड क्षेत्र, उत्पादन आणि जातींची नोंद घेऊन माहिती जाहीर केल्यास शेतकरी तसेच उद्योजकांना नियोजन करणे सोपे होईल. शासनाच्या विविध फलोत्पादन योजनांतून रोपे, तांत्रिक मार्गदर्शन आणि अनुदान मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात आवळा पीक नव्या संधी निर्माण करू शकते.

एकूणच, बदलत्या शेती पद्धतीत आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन आणि टिकाऊ उत्पन्न देणारे पीक म्हणून आवळ्याकडे पाहिले जात आहे. योग्य नियोजन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात आवळा पीक शेतकर्‍यांसाठी नवे आर्थिक दालन खुले करू शकते.

संकरित केलेल्या आवळा जातीची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात आवळा पिकासाठी हुकमी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या पिकाची लागवड अजूनही तुरळक प्रमाणात आहे. परिणामी जिल्ह्यातील फळ विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध होणारा आवळा मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून आणला जात आहे.
विकास पाष्टे, प्रगत शेतकरी, शिरवणे, दापोली

जिल्ह्यात आवळ्याची आंतरपीक म्हणून लागवड

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण परिसरात काही शेतकर्‍यांनी आवळ्याची लागवड फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून केली आहे. स्थानिक बाजारपेठेत ताज्या आवळ्याला मर्यादित मागणी असली तरी प्रक्रिया उद्योगासाठी आवळ्याची मोठी गरज आहे. आवळ्यापासून मुरंबा, कँडी, लोणचे, च्यवनप्राश, आवळा पावडर, तेल तसेच विविध औषधी उत्पादने तयार केली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT