चिपळूण : चिपळूणच्या गुरुकुलमध्ये धडे गिरवताना अमेरिकेची आर्या. 
रत्नागिरी

Chiplun Gurukul School : अमेरिकेची मुलगी शिकायला येते चिपळूणच्या गुरुकुल शाळेत!

भारतीय संस्कृतीच्या ओढीने शिकागोमधून आर्या सलग तीन वर्षे येतेय भारतात !

पुढारी वृत्तसेवा

दीपक शिंगण

रत्नागिरी : पाश्चात्य जीवनशैलीच्या झगमगाटात राहूनही मूळ संस्कृती विसरू नयेत, यासाठी अमेरिकेतील शिकागोमध्ये राहणारी नऊ वर्षांची आर्या मागील तीन वर्षे सातासमुद्रापार चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमधील पंचकोशाधारित गुरुकुल विभागात शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत आहे. भारतीय संस्कृती आणि प्राचीन शिक्षण पद्धतीचा वारसा जपणाऱ्या या गुरुकुलचे कौतुक आता सातासमुद्रापार पोहोचले आहे.

परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलचा गुरुकुल विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या आधारे येथे अध्यापन केले जाते. दिवसातील 11 तास आणि वर्षातील 260 दिवस चालणारे हे अनोखे गुरुकुल संस्कार, कौशल्यप्रशिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची सांगड घालते.

शिकागो ते चिपळूण : अनोखा प्रवास

आर्याची आई, सौ. संपदा (युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी) आणि वडील श्री. रोहित (सॉफ्टवेअर इंजिनिअर) अमेरिकेतील शिकागोमध्ये स्थायिक आहेत. आपल्या मुलीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि येथील शिक्षण पद्धती समजावी, या उद्देशाने त्यांनी आर्याला गुरुकुलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.

आर्याचा दिनक्रम: उपासना ते भात लावणी!

अमेरिकेतील शाळेला सुट्टी पडली की, आर्या आवर्जून चिपळूणच्या गुरुकुलमध्ये दाखल होते. तिचा येथील सहभाग थक्क करणारा आहे.

सकाळची सत्रे : उपासना, प्रार्थना, व्यायाम आणि योगासने. दैनंदिन शिक्षण : संगणक ज्ञान, संगीत आणि हस्तकौशल्य.

विशेष उपक्रम : चिखलात उतरून केलेली भात लावणी, आषाढी एकादशी सोहळा, स्वहस्ते गणेशमूर्ती तयार करणे आणि निवासी शिबिरे. आजच्या काळात जिथे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याची चढाओढ लागली आहे, तिथे अमेरिकेत शिकणाऱ्या आर्याने भारतीय संस्कृतीचा स्वीकार करणे आणि पालकांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT