अलीबाग : अलिबाग पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात अत्यंत धडक कारवाई करत, तालुक्यातील चाळमाळा परिसरात विशेष गस्तीदरम्यान तब्बल ४ कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाच्या उलटीसदृश 'अँबरग्रीस' जप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलिसांनी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयित तस्कराला शिताफीने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांच्या विशेष पथकाने चाळमाळा परिसरात गस्त घालत असताना जेटीजवळ एका संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवून त्याची कसून झडती घेतली. यावेळी दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या एका कापडी पिशवीत पोलिसांना सुमारे ४ किलो वजनाचे 'अँबरग्रीस' आढळून आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या या अमूल्य घटकाची किंमत तब्बल ४ कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
या धडक कारवाईत पोलिसांनी ४ कोटी रुपयांच्या 'अँबरग्रीस'सह संशयित तस्कराची दुचाकीही जप्त केली असून, एकूण हस्तगत केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी आरोपी राहुल पंढरीनाथ हातणी याला ताब्यात घेतले असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.