Ratnagiri Ambergris seizure
रत्नागिरी : दुर्मिळ प्रजातीच्या व्हेल माशाची तब्बल 3 कोटींची 3 किलो 4 ग्रॅम वजनाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्यासाठी आलेल्या तीन संशयितांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आवळल्या. ही कारवाई शुक्रवारी (दि. 31) रात्री 9.21 च्या सुमारास टीआरपी ते एमआयडीसी जाणाऱ्या रस्त्यावरील बाफना मोटर्स कंपनीसमोर करण्यात आली. संशयितांकडून 2 वाहनासह एकूण 3 कोटी 10 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रोहित रमेश चव्हाण (वय 31, रा. आंबेशेत कुरटेवाडी, रत्नागिरी), आसिफ अस्लम मोरस्कर (वय 38, रा. पिंपरी बुद्रुक, नुराणी मोहल्ला, चिपळूण) आणि तेजस पर्शुराम कांबळे (वय 32, मुळ रा. आडरे, चिपळूण सध्या रा. अमतनतारा अपार्टमेंट, रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला काही संशयित एमआयडीसी परिसरात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाव्दारे एमआयडीसी येथील बाफना मोटर्सच्या शेजारी सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी संशयित तीनजण त्याठिकणी आपल्या ताब्यात विना परवाना व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असलेले मिळून आले.
संशयितांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलिस हेड काँस्टेबल बाळू पालकर, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर आणि पोलिस काँस्टेबल अतुल कांबळे यांनी केली.