उदय सामंत.  file photo
रत्नागिरी

रिफायनरीबाबत स्थानिकांच्या भूमिकेसोबतच : उदय सामंत

Maharashtra Election Result | रिफायनरी जबरदस्तीने लादली जाणार नाही

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : नाणार-बारसू रिफायनरीबाबत आमची भूमिका स्थानिकांबरोबर असेल. त्यांना प्रकल्प काय हे पटवून देऊ. त्यांना हवा असेल तर होईल, नको असेल तर तसा विचार होईल. मात्र, रिफायनरी जबरदस्तीने लादली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी उद्योगमंत्री व आ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

विधानसभेच्या निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळाल्यानंतर मुंबईत जाऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते रत्नागिरीत आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मतदार संघातील अपूर्ण कामाचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघात मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाचे काम सुरू आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील एसटी स्टॅण्डच्या कामांची माहिती घेतली. शिवसृष्टी, थिबापॅलेस येथील प्रकल्प, यासह मतदार संघात येऊ घातलेल्या दोन औद्योगिक प्रकल्पांचा आढावा, टाटा स्कील सेंटरच्या कामाची सद्यस्थिती यासह अन्य कामांचा आढावा घेतल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. यातील अनेक कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोकणातील रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुहागरात न जाता काय करू शकतो ....

गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांनी चांगले काम केले. भास्कर जाधव यांचा निसटता विजय झाला. मी रत्नागिरीत येऊन समोरच्यांचा सुपडासाफ करू, असे म्हणणार्‍यांनी मी गुहागरात न जाता काय करू शकतो हे पाहिले, असा टोला उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना लगावला. माझे त्यांच्याशी वैर नाही जे आहे ते राजकीय तात्विक आहे. त्यामुळे ते समोर आले तर आम्ही बोलणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

आश्वासनाची पूर्तता करणार

रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी पर्यटन आराखडा तयार केला जाईल. जास्तीतजास्त पर्यटक या ठिकाणी यावेत यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही आ. सामंत यांनी सांगितले. मी जो मतदारांना शब्द दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT