चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी चिपळुणात पसरताच एकच खळबळ उडाली. जि. प., पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूणमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दादांच्या मृत्यूची बातमी येताच भाजप कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस दुखवटा जाहीर करून सर्व कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आणि प्रचार सभेचा मंडप सुनासुना झाला.
भाजपा नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वा. सावरकर मैदानावर महायुतीच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत व अन्य नेते या सभेला उपस्थित राहणार होते. गेल्या पाच दिवसांपासून या प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात येत होती.
मुख्यमंत्री येणार म्हणून शासकीय यंत्रणादेखील अलर्ट मोडवर होती, पोलिस प्रशासन सज्ज झाले होते. कालपासूनच मैदानावर पोलिसांच्या तपासणी फेऱ्या होत होत्या. आज (दि. 28) सर्व पोलिस बंदोबस्त शहर परिसरात तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चिपळूण शहर परिसर, पवन तलाव मैदान, सभास्थळ, बहादूरशेख चौक आदी भागात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मंडपाची देखील तयारी झाली होती. मात्र, अचानक बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त आहे. यानंतर सर्वत्र एकच शोककळा पसरली.
आयोजकांमध्ये देखील निरूत्साह पसरला आणि काही कालावधीतच मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर चिपळूणमधील सभादेखील रद्द झाल्याचे मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. चिपळूण पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले, कर्मचारी आपल्या मूळ ठिकाणी रवाना झाले.