रोशनी सोनघरे 
रत्नागिरी

Ahmedabad Plane Crash | हवाईसुंदरी रोशनी सोनघरे विमान अपघातात काळाच्या पडद्याआड

अहमदाबाद येथे झालेल्या अपघातात मंडणगडच्या कन्येचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या अहमदाबाद विमान दुर्घटनेने आला. या दुर्घटनेत मंडणगड तालुक्याची कन्या आणि एअर इंडियाची हवाईसुंदरी, रोशनी राजेंद्र सोनघरे (वय 27) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक बातमी समजताच रोशनीचे मूळ गाव बुरीसह संपूर्ण मंडणगड तालुका शोकसागरात बुडाला. अवघ्या 27 वर्षांच्या रोशनीने बुधवारी, 11 जून रोजी लंडनला जाण्यासाठी आपल्या आई-वडिलांचा निरोप घेतला, तो तिचा अखेरचा निरोप ठरला. दुसर्‍याच दिवशी, 12 जून रोजी गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात तिने जगाचा निरोप घेतला आणि एका उमलत्या स्वप्नाचा अकाली अंत झाला.

रोशनीचे कुटुंब मूळचे मंडणगड तालुक्यातील बुरी गावचे असले तरी सध्या ते डोंबिवली पूर्व येथील उमीया इमारतीत वास्तव्यास होते. आई राजेश्री, वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश यांच्यासमवेत ती डोंबिवलीत राहत होती. लहानपणापासूनच तिला हवाईसुंदरी बनण्याचा ध्यास होता. आकाशात भरारी घेण्याची स्वप्ने तिने उराशी बाळगली होती. मुंबईतील सरस्वती इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने भारत कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर अंधेरी येथील एका प्रतिष्ठित संस्थेतून तिने हवाईसुंदरी होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने आपल्या स्वप्नांना गवसणी घातली. 2021 मध्ये ती स्पाईस जेट या विमान कंपनीत रुजू झाली. तेथे दोन वर्षे सेवा केल्यानंतर याच वर्षी, 2024 मध्ये, तिने एअर इंडियामध्ये नोकरी स्वीकारली होती. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने रोशनी नेहमीच उत्साही आणि आनंदी असायची. तिचा हा आनंद मात्र नियतीला पाहवला नाही आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

बुधवारी लंडनला जाण्यासाठी निघताना तिच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद होता, एक नवी उमेद होती. पण हा आनंद अल्पजीवी ठरला. तिच्या अपघाती निधनाची बातमी घरी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मर्चंट नेव्हीमध्ये असलेला तिचा भाऊ विघ्नेश आणि वडील राजेंद्र हे तात्काळ अहमदाबादला रवाना झाले. रोशनीच्या आईला तर या धक्क्यातून सावरणेही कठीण झाले आहे. आपली मुलगी सुखरूप परत येईल, या वेड्या आशेवर त्या अजूनही आहेत. त्यांच्या डोळ्यांतील पाणी अजूनही थांबलेले नाही.

सोनघरे कुटुंब सुरुवातीला मुंबईतील ग्रँट रोड परिसरात राहत होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनीचे वडील तंत्रज्ञ असून, मिळेल ते काम करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मुंबईत वास्तव्य असले तरी सोनघरे कुटुंबाची नाळ आपल्या गावाशी घट्ट जुळलेली होती. गावातील प्रत्येक सण-समारंभात, महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. रोशनीसारखी तरुण मुलगी मोठ्या पदावर पोहोचून तालुक्याचे नाव उज्ज्वल करत असल्याने ती अनेकांसाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी ‘रोल मॉडेल’ बनली होती.

मनमिळाऊ कन्येला गमावल्याची सल

तिच्या अकाली जाण्याने केवळ सोनघरे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण बुरी गाव आणि मंडणगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एका कर्तृत्ववान आणि मनमिळाऊ कन्येला गमावल्याची सल प्रत्येकाच्या मनात आहे. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे.

सोशल मीडियावर प्रभाव

मेहनत, कर्तृत्व, जिद्द यांच्या आधारे स्वप्नांना गवसणी घालून कुटुंब, गावचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारी रोशनी तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनात घर करून गेली होती. तिचं हसतं-खिदळतं चेहर्‍यावरचं तेज आजही सगळ्यांच्या हवाईसुंदरी म्हणून काम करण्याबरोबर रोशनी समाजमाध्यमांत विशेष प्रसिद्ध होती. इन्स्टाग्रामवर रोशनीचे 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT