दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 वा पदवीदान समारंभात बोलताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन. सोबत कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी. pudhari photo
रत्नागिरी

कृषी क्षेत्रात एआय वापराविषयी प्रक्रिया सुरू

राज्यपाल: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 43 वा पदवीदान समारंभ

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवी, ज्ञान आणि केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकर्‍यांना करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या द़ृष्टिकोनातून अधिक प्रात्यक्षिकांवर भर द्यावा, हे खरे यश असेल. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करण्याविषयी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 43 वा पदवीदान समारंभात ते बोलत होते.

यावेळी कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून दिली आहे. विद्यापीठाची महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे, मग ती शेती, फलोत्पादन, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण किंवा कापणीनंतरचे तंत्रज्ञान असो, बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेती, फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले आहे. येथे विकसित केलेल्या तांदळाच्या जातींनी कोकण प्रदेशात उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. विद्यापीठाच्या कलम आणि उत्पादन तंत्रांमुळे या प्रदेशात आंबा लागवडीचा विस्तार झाला आहे.

कृषीमंत्री डॉ. कोकाटे म्हणाले, बदलत्या वातावरणात तग धरून राहणारे अधिक उत्पादनक्षम वाण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा शेती तसेच पशुधन शेती पध्दतीतील संधीचा शोध घेणे या गोष्टी सुध्दा आवश्यक आहेत. कोकणामध्ये भात शेतीला पर्याय नाही, हे खरे असले तरी वरकस जमिनीमध्ये पेरभात पध्दतीचा वापर करून भात शेतीचे कार्बन उत्सर्जन कमी करता येईल का ? यावर संशोधन होणे आवश्यक आहे.

कोकणातील जवळजवळ 3.5 लाख हेक्टर क्षेत्र हे आंबा, काजू आणि इतर फळ पिकांखाली आहे. काजू या पिकांमध्ये सखोल संशोधन केले आहे. ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. प्रशिक्षित तरूण आले तर शेतकर्‍यांना मार्गदर्शन होईलच त्याच बरोबर तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल. हापूस आंबा तर कोकणाची शान आहे. मात्र गेल्यावर्षी थ्रिप्समुुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. विद्यापीठांनी या गोष्टींचा विचार करून शिक्षण, संशोधन आणि शेतकर्‍यांना विस्तार कार्यामार्फत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

विद्यापीठाने भाताच्या 35 जाती विकसित केल्या आहेत आणि 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली जाते. तरुणांना शेतीकडे वळवायचे असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी ध्यानात घेतले पाहिजे. शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचून शेतकर्‍यांना कोणत्या प्रकारचे संशोधन पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे कृषिमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT