रत्नागिरी : राज्यातील शेतीत नव-नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उत्पादन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही अभिनव योजना सुरू केली आहे. इच्छुक शेतकर्यांनी 31 जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत. सर्व शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
या दौर्यांचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढवणे तसेच त्यांना जागतिक स्तरावरील शेतीत होणारे बदल समजावून घेणे हा आहे. योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदाराचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्ष पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही. लाभार्थी शेतकरी असावा. स्व-उत्पन्नाचा चालू कालावधीचा सात-बारा उतारा आवश्यक. शेतकर्यांचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकरी-युवांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक. शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाकडून अभ्यास दौर्यांसाठी सर्व घटकांतील शेतकर्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. दौर्याकरिता जिल्ह्यातील 5 शेतकर्यांना जिल्ह्यात 1 महिला शेतकरी व 1 केंद्र,राज्य स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी व इतर 3 शेतकरी निवडले जाणार आहेत.
या योजनेचा लाभ घेणारी शेतकरी तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. शेतकरी वैध पारपत्रधारक पासपोर्ट असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) अभियंता, कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या) कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठांमार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, असा निकष असणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील उत्पादक शेतकर्यांना प्रगतिशील शेतीचा अनुभव घेण्यासाठी युरोप, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्रायल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया इत्यादी देशांमध्ये निवडक अभ्यास दौर्यांवर पाठवण्यात येणार आहे.