चायनीज फटाक्यांच्या अवैध साठवणुकीवर प्रशासनाची नजर 
रत्नागिरी

Ratnagiri News : चायनीज फटाक्यांच्या अवैध साठवणुकीवर प्रशासनाची नजर

विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे चिपळूण तहसीलदारांचे आदेश; गोदामे, दुकाने तपासणार

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चायनीज फटाके आणि प्रतिबंधित फटाक्यांची अवैध साठवणूक, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी चिपळूण प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा फटाक्यांच्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रवीण लोकरे यांनी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मंगळवारी चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व फटाके विक्रीची दुकाने, गोदामे, साठवणूक केंद्रे तसेच संशयित ठिकाणांची विशेष तपासणी होणार आहे. आवश्यकतेनुसार पोलिस, अग्निशमन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटनेच्या समन्वयाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश आहेत.

विस्फोटक नियम २००८ मधील नियम ७४, ७५, ६२, ६३, ८४, १२७ व १२८ नुसार परवानगीपेक्षा अधिक साठा, परवान्याच्या अटींचे उल्लंघन, सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष तसेच प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होत आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे. प्रत्येक दुकानाचा परवाना, साठवणूक क्षमता, खरेदी-विक्री नोंदी, मालाचा स्रोत आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अवैध साठा जप्त करणे, विक्री रोखणे, दुकान बंद करण्याची कारवाई तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी प्रकरण पोलिसांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, केवळ परवानाधारक दुकानांचीच नव्हे, तर अवैध साठवणुकीचा संशय असलेल्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचे आदेश आहेत. या कारवाईचा सविस्तर अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT