रत्‍नागिरी विभागात बेकायदा उभ्या ३६ खासगी वाहनांवर कारवाई  
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्‍नागिरी विभागात बेकायदा उभ्या ३६ खासगी वाहनांवर कारवाई

कारवाईतून २३ हजारांचा दंड वसूल; बसस्‍थानकासमोर लावलेल्‍या ४८ वाहनांना हाकलले

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या एसटी बसस्‍थानक परिसरात बेकायदेशीपणे उभ्या राहणाऱ्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळ, आरटीओ आणि पोलिसांच्‍या संयुक्‍त मोहिमेत ३६ वाहनांवर कारवाई करून २३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर बसस्‍थानकासमोर लावण्यात आलेल्‍या ४८ वाहनांना तेथून हाकलण्यात आले.

रत्‍नागिरी विभागातील ९ बसस्‍थानकासमोर कित्‍येक खासगी बसेस, वडाप आपल्‍या गाड्या लावून प्रवासी आपल्‍याकडे वळवत असतात. त्‍यामुळे एसटी महामंडळाला त्‍याचा फटका बसत होता. अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईचा बडगा उचलण्यास महामंडळाकडून १ जुलैपासून ही मोहीम जिल्‍ह्यासह राज्‍यभरात सुरू झाली आहे.

रत्‍नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर या प्रमुख बसस्‍थानकांच्‍या २०० मीटर परिघात बेकायदेशीपणे प्रवासी भरणारे वडाप, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि अवैध रिक्षा चालकांवर भरारी पथकांच्‍या वतीने कारवाई करण्यात आली. मात्र एकाही वाहनावर जप्‍ती कारवाई झालेली नाही. एसटी, पोलिस आणि आरटीओ यांनी ३६ अवैध वाहनधारकांवर कारवाई केली. त्‍यामुळे खासगी बसेस, वडाप चालकांचे धाबे दणाणले आहेत.

बसस्‍थानकांनी घेतला मोकळा श्वास

रत्‍नागिरी विभागातील एसटी बसस्‍थानक परिसरात होणाऱ्या अवैध पार्किंग, वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्‍यामुळे महिला, ज्‍येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. एसटी विभागाच्‍या कारवाईमुळे बसस्‍थानकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT