रत्नागिरीत तीन अवैध नौकांवर कारवाई 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत तीन अवैध नौकांवर कारवाई

मत्स्य विभागाची कारवाई; एका एलईडी मासेमारी नौकेचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारी नौकांविरोधात मत्स्य विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येथे तीन नौकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यात एका एलईडी मासेमारी नौकेचाही समावेश आहे. तर दोन नौका या म्हाकुळ पकडणाऱ्या असून, त्यांना रात्रीच्या गस्तीदरम्यान पकडण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्याच्या किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या अवैध मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी एल्गार पुकारला असून, त्या विरोधात मत्स्य व्यवसाय विभागासह मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडेही तक्रार केली आहे. यानंतरही कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री रत्नागिरीजवळील समुद्रात मत्स्य विभागामार्फत गस्त घातली जात असताना दोन स्क्वीड जिगींग नौकांवर कारवाई करण्यात आली. म्हाकुळ पकडणाऱ्या या नौकांमध्ये सानिया हाप्सा ही आयएनडी-एमएच-०४-एमएम-३८५१ ही सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर यांच्या मालकीची असून दुसरी नौका एच. सिमक ही आयएनडी-एमएच-०४-एमएम-६०१ ही सुलताना अख्तर होडेकर यांच्या मालकीची आहे.

भाट्ये खाडीमध्ये शहरानजीकच्या कर्ला जेटीवर तपासणी केली जात असताना गुरुप्रसाद नावाची एलईडी दिव्यांनी सुसज्ज अशी नौका आयएनडी-एमएच-०४-एमएम-३७६६ ही आढळून आली. ही सुगंधा सुरेश ताकले यांच्या मालकीची आहे. या नौकेवरही सागरी नियमानुसार कारवाई करण्यात आली. अवैध मासेमारी विरोधात यापुढेही समुद्रात, जेटीवर व बंदर परिसरात तपासणी करुन कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागातर्फे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT