रत्नागिरी : अयोध्येला जाणार्‍या रेल्वेला रत्नागिरीत झेंडा दाखवताना पालकमंत्री उदय सामंत. pudhari photo
रत्नागिरी

सामंत साहेब तुमच्यामुळे आम्हाला श्रीराम भेटणार

जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांसह रेल्वे अयोध्येला रवाना; पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचार्‍यांनी घ्यावी, असे संगून, सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. यावेळी तुमच्यामुळे आम्हाला श्रीराम भेटणार अशा भावना रेल्वेत बसलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी ना. सामंत यांना सांगितल्या व त्यांचे हातहातात घेऊन आपल्या डोक्याला लावले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याला तीर्थ दर्शनासाठी घेऊन जाणारी कोकणातील पहिली रेल्वे शनिवारी रवाना झाली.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी फित कापून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, असिस्टन्ट मॅनेजर टुरिझम संजय शर्मा, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, प्रांताधिकारी जीवन देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जि.प. माजी सभापती बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, की, जातानाचा अडीच दिवसाचा प्रवास आणि येतानाचा अडीच दिवसाचा हा प्रवास आहे. जसे घरामध्ये मुले आईवडिलांना जी सेवा करतात, मुले ज्याप्रमाणे आईवडीलांची काळजी घेतात, त्यापेक्षा जास्त काळजी आपण सर्वांनी या सगळ्या ज्येष्ठांची घ्यावी. त्यांच्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे. जे आपल्या सर्वांचे स्वप्न होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्या राम मंदिराचे, त्या श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याला रवाना होत आहात. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे आरोग्य पथक पाच दिवस आपल्यासोबत राहणार आहे.

आपण स्वत:ही आपली काळजी घ्या. तसेच मला पूर्ण खात्री आहे, कर्मचारी अधिकारी आपण सगळे आमचे आईवडील असल्याप्रमाणे आपल्या सर्वांची काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अवलंबून न राहता तीर्थ दर्शन व्हावे, यासाठी प्रत्येकी 30 हजार देऊन तीर्थ दर्शन योजना करावी, हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला होता. आज आपल्या जीवनातला सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. कारण, कोकणातून पहिली रेल्वे आपल्या सर्वांना घेऊन अयोध्याला रवाना होते आहेे. पाण्याची, जेवण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. स्वच्छताही चांगली असली पाहिजे. अजून निधीची आवश्यकता लागत असेल तर जिल्हा नियोजन समितीमधून ज्येष्ठांसाठी आजच मंजूर करायला आपण तयार आहोत, परंतु 1 तारखेला झेंडा वंदनासाठी रत्नागिरीला येईन तेव्हा, घरच्यांपेक्षा जास्त चांगली काळजी या प्रवासात आमची घेतली गेली, असे मला सर्व ज्येष्ठांनी सांगितले पाहिजे. मला जमलं तर पुन्हा येत असताना तुमच्या स्वागताला देखील तुमचा मुलगा म्हणून या रेल्वे स्टेशनला मी उपस्थित राहण्याची प्रयत्न करीन. मला शक्य झाल नाही तर अधिकारी, माझे पदाधिकारी नक्की उपस्थित राहतील. सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या.

यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दोन तीन दिवसांपूर्वी काश्मीरला जो प्रकार घडला त्याचा जाहीर निषेध केला.

लाभार्थींना तुळशीमाळ देऊन सत्कार

तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तुळशीमाळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रातनिधिक स्वरुपात पालकमंत्री महोदयांच्या हस्ते अयोध्याला जाण्यासाठीची रेल्वे तिकीटही देण्यात आली. यानंतर ना. सामंत यांनी स्वत: संपूर्ण रेल्वेत फिरुन ज्येष्ठ नागरिकांची चौकशी केली. यावेळी अनेक ज्येष्ठांनी ना. सामंत यांचे हात आपल्या हातात घेत, कपाळाला लावले व आपल्यामुळे आम्हाला राम भेटणार असल्याचे सांगितले. श्रीरामाचे दर्शन भेटणार असल्याने अनेकांनी ना. सामंतांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT