गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार अनिल दुर्गवळी असे या घटनेत जीव गमावलेलल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, गुरुवारी (24 एप्रिल) रात्रीच्या सुमारास ओंकार हा घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ झाल्यानंतर तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. याचवेळी मालगुंड दुर्गवळीवाडी येथील ग्रामस्थ संजय भिवा दुर्गवळी यांच्या घराशेजारील विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर ग्रामस्थ विहिरीच्या ठिकाणी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा ओंकार हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि वाडीतील ग्रामस्थांना दिल्यानंतर आलेल्या ग्रामस्थांनी विहिरीत पडलेला तरुण हा ओंकारच असल्याची खात्री केली.याची माहिती गणपतीपुळे पोलिस चौकीच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहिले असता ओंकार हा तरुण सुमारे 80 फूट खोल विहिरीत पडल्याचे पहिले.
या घटनेचा पंचनामा शुक्रवारी सकाळच्या सुमारास गणपतीपुळे पोलिसांकडून करण्यात आला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओंकार अविवाहित होता. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी करीत आहेत.