रत्नागिरी Pudhari Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा 24 टक्के जास्त पाऊस

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः पावसाचा चार महिन्यांचा हंगाम आटपला असून, यंदा पावसाने समाधानकारक सातत्य ठेवत जिल्ह्यात 4 हजार 200 मि.मी. ची विक्रमी सरासरी गाठली. सरासरीच्या 24 टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. यामुळे पाणी टंचाईची झळ कमी बसणार असली, तरी गेल्या चार महिन्यांत पावसामुळे 29 कोटींचे नुकसान झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाचवेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत सुमारे साडेतीनशे लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करावे लागले होते. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनीही अनेकदा इशारा पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांवर पुराची टांगती तलवार होती. यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते.

चार महिन्यांच्या पाऊस हंगामात अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात घरे, गोठे, जनावरे, दुकाने यांच्यासह विविध सार्वजनिक मालमत्तांचे मिळून एकूण 29 कोटी 43 लाख 13 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर यंदाच्या हंगामात पाऊसबळींची संख्या पाचवर गेली होती. अनेक भागांत अतिजोरदार पावसाने भात शेतीही पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका जिल्ह्यातील सुमारे 2204 शेतकर्‍यांच्या 127 हेक्टर क्षेत्रांतील खरीप लागवडीला बसला. या कालावधीत शासकीय मालमत्तांचे सुमारे 12 कोटी 56 लाखांची हानी झाली आहे. यामध्ये 62 शाळा आणि 17 अंगणवाड्यांचा समावेश आहे. वैयक्तिक मालमत्तांमध्ये घर, गोठे, आणि पडवी आदींची 16 कोटी 34 लाख 56 हजारांची हानी झाली आहे. यामध्ये 977 घरांचा, 142 गोठ्यांचा आणि 538 दुकानांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT