Asurde Railway Station Protest |असुर्डे रेल्वेस्टेशन आंदोलन प्रकरणी माजी काँग्रेस तालुकाध्यक्षांसह २१ जणांची निर्दोष मुक्तता Pudhari Photo
रत्नागिरी

Asurde Railway Station Protest | असुर्डे रेल्वेस्टेशन आंदोलन प्रकरणी माजी काँग्रेस तालुकाध्यक्षांसह २१ जणांची निर्दोष मुक्तता

२०१२ पासून चिपळूण न्यायालयात खटला होता सुरू

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : असुर्डे येथे रेल्वेस्टेशन व्हावे, परिसराचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनप्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल १३ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल शुक्रवारी (दि.२७) लागला असून पुराव्या अभावी संदीप सावंत यांच्यासह सर्व २१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आम्ही विकासासाठी संघर्ष केला.त्यामुळे न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप सावंत यांनी दिली आहे.

चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे रेल्वे स्टेशन व्हावे आणि त्याअनुषंगाने परिसराचा विकास व्हावा, यासाठी त्यावेळचे काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सातत्याने आवाज उठवला होता. रेल्वे प्रशासन तसेच केंद्र शासन आणि लोकप्रतिनिधीकडे त्यांनी सर्व स्तरावर मागणी करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. अनेक वर्षे मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे अखेर संदीप सावंत यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि असुर्डे येथे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन छेडले.

सन२०१२ साली भर पावसात असुर्डे रेल्वे ट्रॅकवर सुरू झालेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली होती. या आंदोलनाची कल्पना मिळताच तत्कालीन खासदार व माजी आमदार देखील आंदोलस्थळी हजर झाले होते. आंदोलन इतके तीव्र बनले की संदीप सावंत व कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. तब्बल २ ते ३ तास भर पावसात हे आंदोलन सुरू होते.आक्रमक झालेले आंदोलक पाहता प्रशासनाने हालचाल करून चर्चेची तयारी दर्शवली होती.

मात्र या आंदोलन प्रकरणी संदीप सावंत यांच्यासह एकूण २१ जणांवर सावर्डे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. २०१२ पासून हा खटला चिपळूण न्यायालयात सुरू होता. अंतिम सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी या प्रकणाचा निकाल देण्यात आला. पुराव्या अभावी न्यायालयाने संदीप सावंत यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचा निकाल यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT