राजापूर : राज्य शासनाच्या मिशन सुधार अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील तब्बल १ हजार ७१० लाभार्थ्यांचा अपात्र लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या या यादीतील लाभार्थ्यांची सध्या गावोगावच्या रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जोरदार पडताळणी सुरू आहे.
समाजातील कमी उत्पन्न असलेल्या गरजू कुटुंबांचे जीवनमान व आरोग्य उंचावावे, तसेच त्यांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा व्हावा, या उद्देशाने शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनिंग धान्याचे वाटप केले जाते. मात्र, या योजनेचा लाभ काही अपात्र लाभार्थ्यांकडून घेतला जात असल्याने खऱ्या गरजवंतांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ मिळावा, तसेच अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची नावे यादीतून वगळण्यासाठी शासनाने 'मिशन सुधार अभियान' राबविले आहे.
या यादीमध्ये दुबार नोंदणी झालेले लाभार्थी, उत्पन्नात वाढ झालेले लाभार्थी, संस्थांचे संचालक असलेले लाभार्थी तसेच सलग सहा महिने रेशनिंग धान्याची उचल न करणारे लाभार्थी यांचा समावेश करण्यात आला आहे.
गावोगावी पडताळणीचे काम सुरू
मिशन सुधार अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अपात्र लाभार्थ्यांच्या यादीची विविध निकषांच्या आधारे पडताळणी करण्यात येत आहे. रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची माहिती तपासण्यात येत असून, प्रत्यक्ष पडताळणीनंतर जे लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरतील, त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणणे, पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ मिळवून देणे आणि अपात्र लाभार्थ्यांमार्फत होणारा गैरवापर रोखणे हा या अभियानाचा उद्देश आहे. खऱ्या गरजवंतांना लाभ मिळणार?
मिशन सुधार अभियानामुळे सार्वजनिक
वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन रेशनिंग धान्याचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. मात्र सध्या यादीतील सर्व १,७१० नावे प्राथमिक पडताळणीसाठी असल्याने अंतिम अपात्र लाभार्थी संख्या पडताळणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या अंतिम कारवाईकडे संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात ३० हजारांहून अधिक रेशनकार्डधारक
राजापूर तालुक्यात अंत्योदय योजनेचे ४ हजार २३४, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे २६ हजार २३८ लाभार्थी असून, दोन्ही योजनांमध्ये मिळून तालुक्यात ३० हजारांहून अधिक रेशनकार्डधारक आहेत. या मोठ्या लाभार्थी संख्येच्या तुलनेत १ हजार ७१० लाभार्थी अपात्रता यादीत आल्याने पुरवठा विभागाच्या पडताळणी प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. पडताळणीनंतर प्रत्यक्षात यापैकी किती लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरतात आणि कितीजण पात्र असल्याचे स्पष्ट होते, याबाबत उत्सुकता आहे.