रत्नागिरी : महावितरणच्या कामाचा सध्या सर्वत्र गोंधळ उडाला असून अनेक ठिकाणी वीज सातत्याने जात आहे. रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी अंडरग्राऊंड केबल टाकण्यात आलेल्या असून बोगस कामांचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. शहरातील मच्छीमार्केट, झारणीरोड परिसरात रविवारी रात्री गेलेली वीज सोमवारी दुपारपर्यंत न आल्याने नागरिकांमधून महावितरण कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल 16 तासांनंतर येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण कर्मचार्यांना यश आले.
मान्सूनपूर्व पावसाने यावेळी महावितरणची चांगलीच झोप उडवली आहे. मे च्या 15 तारखेनंतर पाऊस कोसळल्यामुळे पावसाच्या आधीची कामे फारशी करता आली नाही. त्याचे परिणाम आता पाऊस सक्रीय झाल्यानंतरही नागरिकांना सहन करावे लागत आहेत. रत्नागिरी शहरात अंडरग्राऊंड केबलद्वारे अनेक ठिकाणी वीज प्रवाह पुरवण्यात येतो. परंतु काही डीपी हे गटारांवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गटारांमधून येणारे उंदीर, घुशी यांनीही डिपीमध्ये शिरकाव केला आहे. मच्छीमार्केट, झारणी रोड परिसरात असणार्या डिपीच्या खोक्यामधून मोठ्या प्रमाणात कचरा महावितरण कर्मचार्यांनी बाहेर काढल्याचा प्रकार नागरिकांनी पाहिला. या भागात वारंवार वीज जाण्याचे प्रकार पाऊस सुरु झाल्यापासून घडत आहेत. अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे काम करणार्या ठेकेदाराने मागील काही दिवस वीज जाण्याचे प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही.
रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास या भागातील वीज गेली होती तर याच परिसरात काही ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा सुरु होता. रात्री गेलेली ही वीज सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर आली. महावितरण कर्मचार्यांना अंडरग्राऊंड केबलमधील फॉल्ट सापडला होता. परंतु त्यासाठी खोदाई करावी लागणार होती. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर अभियंता कुंभार आणि त्यांच्या सात ते आठ कर्मचार्यांच्या पथकाने यावर मार्ग म्हणून ओव्हरहेड वायर टाकून या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. सकाळपासून दुपारपर्यंत जवळपास पाच ते सहा तास राबून या पथकाने हे काम पार पाडले. परंतु ठेकेदाराने अंडरग्राऊंड? ? केबल टाकताना केलेल्या चुका आता महावितरण अधिकारी आणि कर्मचार्यांना निस्तराव्या लागत आहेत.