राजापुरात १३ मोकाट गुरांची चिपळूण गोशाळेत रवानगी  
रत्नागिरी

Ratnagiri News : राजापुरात १३ मोकाट गुरांची चिपळूण गोशाळेत रवानगी

नगर परिषद प्रशासनाकडून माेकाट गुरांची धरपकड मोहीम सुरूच; गुरे मालकांच्‍या असहकार्यामुळे निर्णय

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : शहरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या मोकाट गुरांच्या प्रश्नावर राजापूर नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून विशेष धरपकड मोहिमेत पकडलेल्या १३ मोकाट गुरांची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून चिपळूण येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. गुरेमालकांच्या असहकार्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राजापूर शहरासह परिसरातील अनेक गुरे बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाटपणे वावरत असल्याने व्यापारी, नागरिक, विद्यार्थी तसेच गुरुवारच्या आठवडा बाजारासाठी येणारे बाहेरील व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. या मोकाट गुरांमुळे शहरात अनेक लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या असून ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत होती. यापूर्वी नगरपरिषदेकडून मोकाट गुरांची धरपकड करून ती संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच तीच गुरे पुन्हा शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसून येत असल्याने प्रशासनाने यावेळी अधिक कठोर भूमिका स्वीकारली.

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयानुसार मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून १३ मोकाट गुरांची धरपकड केली. ही गुरे जुन्या रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवण्यात आली होती. २० ते २५ दिवस नगरपरिषदेच्या वतीने त्यांना चारा, पाणी आणि आवश्यक देखभाल पुरविण्यात आली. घंटागाडीच्या माध्यमातून गुरेमालकांना वारंवार आवाहन करून दंड भरून गुरे ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले. काही गुरेमालकांनी दंड भरून आपली गुरे परत नेली, तसेच भविष्यात गुरे मोकाट न सोडण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. मात्र, उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्याने नगरपरिषदेकडून आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गुरांची वैद्यकीय तपासणी करून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार पूर्ण झाल्यानंतर या सर्व गुरांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली.

दरम्यान, राजापूर शहरातील मोकाट गुरांविरोधातील धरपकड मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरेमालकांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाईसह कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT