राजापूर, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपुर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसुड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या ऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर – हातिवले येथीृल टोल नाका मनसे पदाधिकार्यानी फोडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसानी मनसे राजापूर तालुका अध्यक्ष पंकज सिताराम पंगेरकर व उपाध्यक्ष जयेंद्र विलास कोठारकर याना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबइ गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकार्यानी आपला राग राजापूर – हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी सायंकाळी उशीरा पंकज सिताराम पंगेरकर ( वय ३४ ) राहणार अणसुरे पंगेरेवाडी राजापूर तालुका मनसे अध्यक्ष व जयेंद्र विलास कोठारकर ( वय ३८ ) राहणार धाउलवल्ली कोठारकरवाडी , मनसे तालुका उपाध्यक्ष याना तात्काळ ताब्यता घेत चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे.