बोर्ली पंचतन; पुढारी वृत्त्तसेवा : पुणे येथून रविवारी पर्यटनासाठी आलेले चार तरुण समुद्रामध्ये पोहायला गेले होते. यातील एका बुडणाऱ्या तरूणाला बोटिंगवर काम करणार्या सागर सुरक्षा रक्षक तरुणांनी समुद्रातून बाहेर काढत कृत्रिम श्वाशोस्वास देऊन त्याचे प्राण वाचविले.
पुणे येथील चार तरुण दोन दिवसांच्या सुट्टीसाठी दिवेआगर येथे पर्यटनासाठी आले होते. चौघे मित्र दुपारच्या सुमारास समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी तरूण उमाकांत वैदनात सकनुरे (रा.पुणे) हा पाण्यामध्ये बुडाला. त्यास समुद्रकिनार्यावरून जाणारे स्थानिक तसलीम साखरकर यांनी पाहिले. त्यांनी लगेच नजीक असलेल्या सुमया बोटिंग सर्व्हिसवर काम करणाऱ्या मौजम मालपेकर आणि तौसीफ अपराध या दोन तरूणांना घटनेबद्दल सांगितले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ समुद्रात उड्या मारुन बुडणार्या उमाकांत सकनुरे यास बाहेर काढून समुद्रकिनारावर आणले.
उमाकांत सकनुरे याच्या नाका-तोंडात समुद्राचे खारेपाणी गेल्याने तो गुदमरुन बेशुद्ध अवस्थेत होता. मौजम मालपेकर आणि तौसीफ अपराध या दोघा तरुणांनी तत्काळ सकनुरे यास कृत्रिम श्वाशोस्वास देण्यास सुरुवात केले. त्याच्या पोटात गेलेले खारे पाणी बाहेर काढत त्याला शुद्धीवर आणण्यात यश मिळवले.
उमाकांत सकनुरे यास पुढील उपचाराकरिता तत्काळ माणगाव उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सकनुरे यास वाचवणार्या मौजम मालपेकर आणि तौसीफ अपराध या दोघा तरुणांनी आपत्कालीन सेवेचे प्रशिक्षण घेतल्याने त्यांना तरुणास वाचवण्यात यश आले. सुमया बोटींवर काम करणार्या या मौजम मालपेकर आणि तौसीफ अपराध या दोघा तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा;