कोकण

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीस सात वर्षांची शिक्षा

backup backup

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

गंधार प्रदीप साळवी (वय ३१, रा.मांडवी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीतेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपी गंधारने पिडीत अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. २० जुलै २०१७ ते ७ जलुै २०१९ या दोन वर्षांच्या काळात आरोपी गंधारने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले होते.

दरम्यान, ७ जुलै २०१९ रोजी आरोपीने तू अजून वयाने लहान असल्याने मी लग्नाला नकार देत असल्याचे पिडीतेला सांगितले. त्यानंतर पिडीतेने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गंधार विरोधात भादंवि कलम 376,506 आणि पोक्सो कायद्यांतर्गत ३,४,७,८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी.डी.मुसळे आणि लक्ष्मी सुर्यवंशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी एकूण १७ साक्षीदार तपासत केलेला युक्तिवाद विशेष पोक्सो न्यायाधिश वैजयंतीमाला राऊत यांनी ग्राह्य मानून गंधार साळवीला भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्ष शिक्षा १० हजार रुपये दंड,भादंवि कलम ५०६ मध्ये २ महिने शिक्षा २ हजार रुपये दंड,पोक्सो कायद्यांतर्गत ३,४ मध्ये ७ वर्ष शिक्षा आणि १० हजार दंड तसेच ८ मध्ये ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड अशी एकूण ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेड काँस्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.

SCROLL FOR NEXT