कोकण

रत्नागिरी : खून प्रकरणी वेळणेश्वर मधील एकाला जन्मठेप

backup backup

चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील नंदकुमार बाबाजी तांडेल याला खून व खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासाठी सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी न्यायाधीशांसमोर जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एस मोमीन यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

वेळणेश्वर खारवी वाडी येथील संशयित आरोपी नंदकुमार बाबाजी तांडेल याची पत्नी अंजनी आणि दिवाकर हरी तांडेल यांची पत्नी देवयानी तांडेल यांच्यात शाब्दिक बचावाची झाली होती. त्याचे रूपांतर भांडणात झाले. शिवीगाळ आणि एकमेकांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. हा वाद मिटवण्यासाठी खारवी समाजाची बैठक ही बोलवण्यात आली होती. मात्र, बैठकीनंतरही नंदकुमार तांबे याने दिवाकर तांडेल यांच्यावर राग होता.

दि २८ जुलै २०१८ रोजी दिवाकर तांडेल यांचे प्रफुल्ल आणि प्रफुल्ली अशी दोन मुले सकाळी सात वाजता शाळेत गेले. दिवाकर तांडेल हे दुपारी बारा वाजता घरच्या खोलीत जेवण करत होते. त्यावेळी नंदकुमार बाबाजी तांडेल हा दिवाकर तांडेल यांच्या घरात काठी घेऊन घुसला आणि दिवाकर तांडेल यांच्या डोक्यावर मरेपर्यंत फटके मारले. दिवाकर तांडेल यांचा जीव गेल्यानंतरही नंदकुमार तांडेल त्याला काठीने मारत होता. त्यावेळी पत्नीने माझ्या नवऱ्याला मारू नका, अशी दयावया केली. परंतु, नंदकुमार तांडेल याने मद्यपान केले होते. त्या नशेत त्याने दिवाकर तांडेल यांच्या पत्नीलाही दुखापत केली. नंदकुमार तांडेल याला तिची पत्नी अंजनी हिने दिवाकर तांडेल यांच्या घरातून ओढत बाहेर काढले. तेव्हा हा प्रकार शेजारच्या लोकांना समजला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी काहींनी देवयानी तांडेल यांना अधिक उपचारासाठी गुहागर येथे आणले.

उपचार घेतल्यानंतर देवयानी तांडेल हिने नंदकुमार तांडेल यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुहागरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी दिवाकर तांडेल यांच्यावतीने आरोपी नंदकुमार तांडेल याला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन यांनी नंदकुमार तांडेल यांना तीन वेगवेगळ्या गुन्हे अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच अठरा हजार रुपयांचे दंडही थोटावला आहे. दंड न भरल्यास अकरा महिन्याची सश्रम कारावासी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT