दापोली : रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी दापोलीत आलेले भाजप नेते किरीट सोमय्या प्रसारमाध्यमांशी बोलताना. सोबत माजी खासदार नीलेश राणे आदी. 
कोकण

रत्नागिरी: दापोली पोलिस ठाण्यात किरीट सोमय्यांचा ठिय्या!

backup backup

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : मुरूड समुद्रकिनारी असलेले कथित अवैध रिसॉर्ट तोडण्यासाठी 'चलो दापोली', असा नारा देत दापोली दौर्‍यावर आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत रिसॉर्टविरोधात एफआयआर दाखल करावा, यासाठी दापोली पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

सोमय्या यांच्या 'हाय व्होल्टेज ड्राम्या'मुळे दापोली आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी सोमय्या यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करीत ठाकरे सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढेन, अशा शब्दात सरकारला पुन्हा डिवचले.

सोमय्या यांच्या दापोली दौर्‍यादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दापोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, विभागीय पोलिस अधिकारी काशीद सर्व घटनेवर लक्ष ठेऊन होते.

शनिवारी सोमय्या हे दापोली बसस्थानक परिसरात येताच येथे त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारचे सगळे घोटाळे आपण बाहेर काढणार आहोत. यावेळी भाजपचे राज्य सरचिटणीस व माजी खासदार नीलेश राणे, केदार साठे, मकरंद म्हादलेकर आदी पदाधिकारी सोबत होते.

ना. अनिल परब यांच्या मुरूड येथील कथित रिसॉर्ट

प्रकरणी दापोलीत येणार्‍या सोमय्या यांचा कडाडून विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर आधी शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.

यावेळी या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवून सोमय्यांचा निषेध केला. पर्यटन व्यावसायिकांच्या जीवावर उठलेल्या सोमय्यांचा निषेध असो, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोमय्या यांना दापोली आझाद मैदान मार्गे केळसकर नाका या मार्गी दापोली पोलिस ठाण्यात केवळ किरीट सोमय्या यांनाच प्रवेश देण्यात आला.

यावेळी नीलेश राणे यांनी आपणास धकाबुक्की झाली, असा आरोप केला. त्यावर कार्यकर्त्यांनी कोणी धकाबुक्की केली, असे म्हणत गोंधळ घातला आणि ते पोलिस अधीक्षकांच्या दिशेने धावले. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नीलेश राणे यांना देखील किरीट सोमय्या यांच्यासमवेत दापोली पोलिस ठाण्यात प्रवेश देण्यात आला.

नीलेश राणेंना धक्काबुक्की!

माजी खासदार नीलेश राणे यांना धक्काबुक्की झाली असता, कोणी धक्काबुक्की केली, कोण आहे रे तो, घ्या त्याला ताब्यात, असा भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ उडविला. या घटनेवेळी काही अघटित प्रकार घडतोय की काय, अशी स्थिती निर्माण होत काहीकाळ तणाव निर्माण झाला. मात्र, काही वेळाने सर्व वातावरण शांत झाले.

तुमचा घातपात होणार : पोलिस अधीक्षकांचे पत्र

सोमय्या यांना पोलिसांनी साई रिसॉर्टकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घातपात होणार असल्याचे पत्र दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला असून आपल्याला कार्यकर्त्यांपासून लांब ठेवले आहे. रत्नागिरी पोलिस अधीक्षक व शिवसेनेने आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. आमच्या 200 गाड्यांना परत पाठवले. फक्त 4 लोकांना त्यांनी आत चर्चेस घेतले आणि काहीच चर्चा केली नाही. पोलिस अधीक्षक बदमाश आहेत, असे देखील सोमय्या यांनी सांगितले.

एफआयआर दाखल करून घेण्यास नकार…

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्टविरोधात आम्ही पोलिसांकडे एफआयआर दाखल करत होतो. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही पोलिस स्थानकाच्या पायर्‍यांवरच ठिय्या मांडला आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, सोमय्या मौन धारण करून बसले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT