कोकण

‘दामिनी अ‍ॅप’ सांगणार वीज कुठे पडणार?

backup backup

दापोली (रत्नागिरी), पुढारी वृत्तसेवा :  पावसाच्या सुरुवातीच्या आणि मान्सून परतण्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचे मृत्यू होत असतात. जून, जुलै आणि त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत राज्यामध्ये वीज पडून अनेक ठिकाणी लोकांचे मृत्यू होत असतात. या घटना टाळण्यासाठी आता 'दामिनी' सरसावली आहे. वीज कुठे पडणार हे आता दामिनी अ‍ॅप सांगणार आहे. वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर याबाबत अलर्ट केले जाणार आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी या अ‍ॅपचा अशा संकटकाळात मोठा फायदा होणार आहे.

अंदमान, निकोबारमध्ये मान्सून दाखल होऊन तो अरबी समुद्रापर्यंत आला आहे. आता काही दिवसांत तो केरळमध्ये दाखल होऊन कोकण किनारपट्टीसह संपूर्ण राज्यात सक्रिय होणार आहे. सुरुवातीच्या काळात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो. या काळात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडतात व त्यात नाहक बळी जातात. या पार्श्‍वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 'दामिनी' अ‍ॅप बनविण्यात आले आहे. भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या वतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून गुगल प्‍ले स्टोअरवर ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मंडळ अधिकारी, महसूल विभाग, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक अशा सर्वांकडे हे अ‍ॅप असणे महत्त्वाचे आहे. हे अ‍ॅप 'जीपीएस' लोकेशनने काम करणार असून वीज पडण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर या अ‍ॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये सभोवताली कुठे वीज पडण्याची शक्यता आहे, सदर ठिकाणापासून

सुरक्षित स्थळी जावे किंवा झाडाच्या खाली उभे राहू नये, झाडांचा आश्रय घेऊ नये या बाबत निर्देश मिळणार आहेत. त्यामुळे या अ‍ॅपचा उपयोग सर्वांनाच होणार आहे. या अ‍ॅपवर मिळणार्‍या सूचनांनुसार वीज पडण्याआधी लोकांना अलर्ट केले जाणार आहे. या अलर्टनुसार प्रशासकीय अधिकार्‍यांनी संबंधित ठिकाणी पूर्वसूचना दिल्यास नागरिकांना संकटाची कल्पना येईल आणि जिवीतहानी टाळता येईल. अनेकवेळा वीज पडून कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. त्यावर पृथ्वी मंत्रालयाने हे अ‍ॅप शोधून काढले आहे. वीज ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणचे लोकेशन अ‍ॅपवर दाखविले जाईल.

वीस ते चाळीस कि.मी.चा परिसर दाखविला जाईल. या शिवाय अ‍ॅपवर 'बिजली की चेतावनी नहीं है' किंवा 'बिजली की चेतावनी है' या सारखे मेसेज दिले जाणार आहेत. प्रत्येक पाच मिनिटांनी या बाबत अपडेट माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला हे अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळामध्ये लोकांना त्यातून पूर्वसूचना मिळेल आणि भविष्यातील संकट टाळता आले नाही तरी त्या पासून होणारी जीवित व वित्तहानी वाचविण्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंधरा मिनिटे आधीच वीज कुठे पडणार याची माहिती मिळणार असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे.

  • पंधरा मिनिटे अगोदर मिळणार अलर्ट
  • मनुष्यहानी टळणार
  • पृथ्वी मंत्रालयाने बनविले अ‍ॅप

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT