कोकण

रत्नागिरी : आईस्क्रिम विक्रेत्याला घातला ५१ हजारांचा ऑनलाईन गंडा

Shambhuraj Pachindre

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आर्मीतून बोलत असल्याची बतावणी करत निवळीतील आईस्क्रिम विक्रेत्याची अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गोवर्धन भागू गाडरी (वय २५, रा. निवळी तिठा, मुळ रा. राजस्थान) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, गोवर्धन गाडरी यांचा निवळी तिठा येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. दि. १९ जून रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात आईस्क्रिम विक्री करत असताना दुपारी ३ च्या सुमारास त्यांना अज्ञाताने फोन केला. यावेळी समोरील व्यक्तिने आपण आर्मीतून मेजर बोलत असून दि. २० जून २०२३ रोजी रत्नागिरीतील चरवेली येथे आर्मीची पार्टी आहे असे सांगितले. यावेळी तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले.

आईस्क्रिम देण्याची ऑर्डर मान्य करत गोवर्धन यांनी अगावू रकमेची मागणी केली. मात्र आर्मीमध्ये गुगल पे, फोन पे चालत नाही. आईस्क्रिम पोच होताच तुमचे पैसे देण्यात येतील असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर गोवर्धन व त्यांचा मावस भाऊ हे आईस्क्रिम घेवून चरवेली येथे पोहचले. यावेळी गेटपास तयार करावयाचा आहे असे सांगून तक्रारदार यांना चरवेली मंदिराजवळ थांबवून ठेवण्यात आले.

ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोनवरून बोलणार्‍या व्यक्तिने आमचे कॅप्टन तुमच्याशी बोलणार आहेत असे सांगितले. यानंतर कॅप्टन म्हणून बोलणार्‍या व्यक्तिने तक्रारदार यांच्या मोबाईलवर स्कॅनर कोड पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले. स्कॅनर डाऊनलोड केल्यानंतर त्यामाध्यमातून आर्मीचे नियम असल्याचे सांगून त्यांनाच पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार गाडरी यांनी ५१ हजार रूपये संबंधित व्यक्तिला ऑनलाईन पद्धतीने दिले. मात्र, त्याबदल्यात त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे गाडरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT