कोकण

रत्नागिरी : बारसूत आंदोलन तीव्र; 110 जण ताब्यात

मोहन कारंडे

राजापूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम मंगळवारी दुपारपासून सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी सोमवारपासूनच बारसू येथील सड्यावर शेकडो ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले होते. मंगळवारी दुपारी आंदोलकांनी संतप्त होत पोलिसांच्या वाहनांसमोर झोपून शासकीय वाहने अडवली. त्यानंतर आंदोलक महिलांसह एकूण 110 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना रत्नागिरीत नेले. त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रिफायनरीविरोधी संघटनेच्या मुंबईतील अध्यक्षालाही ताब्यात घेण्यात आले. तणावपूर्ण वातावरणात येथील माती सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या दडपशाहीमुळे वातावरण अधिकच चिघळले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक याठिकाणी तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी याठिकाणी तणावाचे वातावरण होते. बारसू परिसरातील प्रस्तावित माती परीक्षणाच्या कामात प्रकल्प विरोधकांकडून अडथळे येऊ नयेत म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. राजापूर तहसीलदार शीतल जाधव यांनी 22 एप्रिल ते 31 मे या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला आहे. मात्र, हा विरोध झुगारून रविवारपासूनच बारसूच्या सड्यावर प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक गोळा होऊ लागले होते. सोमवारीही सड्यावर मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाले होते.

मंगळवारी आंदोलक संतप्त झाले. सकाळी काही महिला भगिनींनी रस्त्यावर पुन्हा ठिय्या मांडला व पोलिसांच्या वाहनांपुढे रस्त्यावर झोपून त्यांनी रस्ता अडवला. पोलिसांनी सुमारे 30 ते 35 महिला आंदोलकांना ताब्यात घेत रत्नागिरीला रवाना केले. त्यानंतर रिफायनरीबाबतच्या मुंबई संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांनाही पोलिसांनी राजापुरातून ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. रिफायनरीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय आखाडा रंगू लागला आहे. तर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सड्यावर उतरलेल्या महिला भगिनींसह आंदोलकांनी जमिनींसाठी लढा … सडा सोडू नका… कितीही दिवस जावोत; जमीन सोडू नका … आर या पार … अशा आशयाची चिठ्ठी एका प्रकल्पविरोधी नेत्याने आंदोलकांना? उद्देशून लिहिली आहे. ती चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी नाणार रिफायनरी विरोधात? भूमिका बजावणारे अशोक वालम यांनीही बारसूच्या सड्यावर जाऊन तेथे ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे एका झाडावरून त्यांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवस येथील स्थानिक ग्रामस्थ सड्यावर ठाण मांडून बसले आहेत.

आंदोलनाचा उद्धव ठाकरेंकडून आढावा

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात जे आंदोलन सुरू आहे, ते प्रशासनाने समज दिल्यावरही थांबले नाही. काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नसल्याची स्थानिकांनी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा आढावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतला. बारसू येथे सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती खासदार विनायक राऊत यांच्याकडून ठाकरेंनी घेतली. ठाकरे गटाने यापूर्वीच स्थानिकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाला सहकार्य करा, असे आवाहन यापूर्वी केले आहे. मात्र सोशल मीडियावरून काही लोक गैरसमज पसरवून कायदा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तशी कारवाई देखील जिल्हा पोलिस दलाकडून सुरू आहे. याविषयी आम्ही स्थानिकांना समजून सांगणार आहोतच. सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT