पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ वरचीवाडी येथे बुधवारी (दि.१९) रात्री १२ च्या सुमारास गावाच्या बाजून वाहणाऱ्या ओढ्याजवळ भुस्खलन झाले. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दुर्घटनेआधीच २५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे.
भुस्खलनाची माहिती नानेघोळ गावचे पोलिस पाटील सुरेश जंगम यांनी आपत्ती निवारण कार्यालयात दिल्यानंतर पोलीस अधिकारी युवराज म्हसकर, निवासी नायब तहसिलदार पाटील, तलाठी यांनी घटनास्थीळी भेट दिली. भुस्खलनामध्ये ज्ञानोबा गोविंद जाधव, चंद्रकांत गोविंद जाधव, दत्ताराम गोविंद जाधव, पांडुरंग रायबा रानोके, सहदेव पांडुरंग दाभेकर यांच्या घरे जमिनदोस्त झाली आहेत. या घरांमध्ये वास्तव्यास नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. यातील एका घरामध्ये अडकलेली ४ जनावरांना आपत्ती निवारणच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
नानेघोळ येथील वरची वाडी येथे एकूण २५ घरे असून त्यातील सर्व रहिवाशाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील गेल्या ४८ तासात पावसाचे रौद्र रूप पाहवयास मिळत आहे. तालुक्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पोलादपूर शहरातील नदीकिनारी जुना महाबळेश्वर मार्ग, सिद्धेश्वर आळी व भैरवनाथ नगर रस्त्यावर पाणी आले आहे.
सवाद गावात बुधवारी आलेल्या सावित्री पुराच्या पाण्यात अडकलेल्या हावरे गावातील ३ कुटुंबांना रेस्क्यू करत सुरक्षित ठिकाणी हलविले होते. तर सडवली गावातील शिवाजीनगर येथील राहिवाशांनाही ग्रामपंचायत कार्यलयात हलविण्यात आले होते. तसेच माटवन मोहल्ला मधील २१ नागरिकांना त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांच्याकडे हलविण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यातील अनेक मार्गांवरून पाणी वाहत आहे.