कोकण

Mumbai Goa highway : सुमारे दोन तास मुंबई-गोवा महामार्ग ठिय्या आंदोलन! खड्डे मुक्त रस्त्यांची माझं पेण समितीची मागणी

backup backup

पेण; कमलेश ठाकूर : मुंबई-गोवा महामार्गाचे काम योग्य प्रकारे व्हावे याकरिता आज (दि. १६) 'माझं पेण संघर्ष समिती'ने महामार्गावर  ठिय्या आंदोलन  केले. हा महामार्ग बंद करत समितीकडून हे आंदोलन करण्यात आले. (Mumbai Goa highway) यावेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा उपस्थित होता. हे आंदोलन यावेळी शिस्तबद्ध करण्यात आले. यावेळी आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू नये याकरिता स्वयंसेवकांनी काम केले. किमान दोन तास दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू असून, सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे इथे झालेल्या अपघातांमध्ये हजारो बळी गेले आहेत. याच कारणास्तव हा महामार्ग वापरण्यास योग्य नसल्याचे हायकोर्टाने ताशेरे देखील ओढले आहेत. या महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप ते रामवाडी या बंदिस्त पुलामुळे पेणचे अस्तित्व मिटत असल्याचे येथील नागरिकांची तक्रार आहे.

रविवारी माझं पेण संघर्ष समितीकडून मुंबई गोवा अलिबाग महामार्ग बंद करण्यात आला. यावेळी साक्षात यमदूत महामार्गावर अवतरले असल्याचे चित्र देखील दिसून आले. महामार्ग दुरूस्तीच्या मागण्या घेऊन आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून याआधी देण्यात आला होता. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेकडोच्या संख्येने पेणकर रस्त्यावर उतरले व महामार्ग दोन तास रोखून धरला.

खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व

मुंबई-गोवा-अलिबाग राष्ट्रीय महामार्गासाठी अनेकदा सामाजिक राजकीय संघटनांनी आंदोलने केली. मात्र याकडे सरकारसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हा एकमेव महामार्ग रखडलेल्या अवस्थेत राहीला आहे. बारा वर्षे पूर्ण होत आली तरीही पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा पूर्ण होत नाही. या रस्त्यात आजही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तसेच खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर स्त्रिया या सर्वांना प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे शासन जोपर्यंत या महामार्गाची दुरावस्था दूर करत नाही तोपर्यंत माझं पेण या समितीमार्फत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राजू पाटील व आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

पोलीस व शासकीय अधिकारी यांच्याकडून महामार्गच्या सुधारणेचे आश्वासन

पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे माझं पेण समिती चर्चेसाठी तयार झाली. त्यानंतर सुमारे दोन तासानंतर महामार्गावरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर प्रांत कार्यालयात माझं पेण समिती व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पेण येथील नागरिक यांना लेखी आश्वासन देण्यात आले. लवकरात लवकर तातडीने महामार्गची सुधारणा करण्यात येणार असून पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात येणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. यानंतर जर का तातडीने महामार्गाची सुधारणा न झाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचे समितीने सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT