कोकण

मंत्री दीपक केसरकर यांची सुरक्षा रामभरोसे: सुरक्षेविना कोकण रेल्वेतून प्रवास

अविनाश सुतार

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : सत्तानाट्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणारे मुख्य प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयात शेकडो पोलिसांनी गराडा घातला आहे. तर त्यांच्यासोबत मात्र एकही पोलीस सुरक्षेसाठी नाही. याबाबत केसरकर यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना वैभववाडी रोड रेल्वे स्टेशनवर केवळ एका पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा मुंबई पर्यंत पुरवण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस खात्यात रातोरात बदल्या करण्यात येत असल्याची चर्चा सुरू असतानाच माजी गृहराज्यमंत्री, विद्यमान शालेय शिक्षण, पर्यावरण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या पोलीस संरक्षणाच्या बाबतीत पोलिसांचा ढिसाळपणा समोर आला आहे. मंत्र्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असल्याचे रविवारी रात्री उघडकीस आले.

सत्ता नाट्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट निवास आणि संपर्क कार्यालयाला पोलिसांनी गराडा घातला. दोन बी डीएसची पथके आणि व्हॅन तैनात करण्यात आली. त्यांच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवण्यात आली. तसेच केंद्र शासनाने गुवाहटीपासून मुंबईपर्यंत अगदी वांद्रे सिलिंगवरून जातानाही कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली.

केसरकर निवासस्थानी असो किंवा नसो त्यांच्या निवासस्थानी दिवस रात्र पोलीस संरक्षण सज्ज ठेवण्यात आले. मात्र, त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी पोलीस नसल्याची बाब रविवारी उघडकीस आली. रविवारच्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुका दौऱ्यात मंत्री केसरकर यांना पोलीस संरक्षण दिले होते. मात्र, कोकण रेल्वेतून कोकण कन्या एक्सप्रेसने प्रवास करताना पोलीस गार्ड दिला नसल्याचे समोर आले आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर आले. तेव्हा त्यांच्या समवेत सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे व अन्य पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

मात्र, कोकणकन्या एक्स्प्रेससाठी केसरकर रविवारी रात्री सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्टेशन वर आले . त्यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना केसरकर यांनी रेल्वेत पोलीस गार्ड आहे ना? असे विचारले असता फोनाफोनी सुरू झाली. रेल्वेच्या डब्यात पोलीस गार्ड तैनात नव्हता. त्यामुळे शंकर कोरे यांच्या हालचालीनंतर वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस गार्ड नेमणूक करण्यात आली. सावंतवाडी ते वैभववाडीपर्यंत केसरकर यांना रेल्वेतून संरक्षण दिले नसल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या आमदारांना केंद्र व राज्य सरकारची सुरक्षा असेल असे म्हटले होते. केसरकर कॅबिनेट मंत्री असूनही त्यांच्या सुरक्षेची काळजी पोलीस विभागाने घेतली नाही. त्यांच्यासोबत केंद्र सरकारचे ही सुरक्षा पथक नव्हते किंवा मुंबई पोलिसांचेही पथक नव्हते. ते एकटेच रेल्वेतून प्रवास करत होते. याबाबतची उघड नाराजी मंत्री केसरकर यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे व्यक्त केली. तर कोरे यांनी ही बाब आपल्याकडे नसून उपअधीक्षक किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे असल्याचे सांगून हा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT