कोकण

Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा

Arun Patil

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदेंपेक्षा ठाकरे गट सरस ठरत असताना ठाण्यात मात्र शिंदेंची आगेकूच कायम राहिली आहे. मुख्यमंत्र्याचे ठाणे कुणाला कौल देणार, याचा निर्णय अखेर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेत 2 लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईत ठाणे शिंदेंच्या शिवसेनेने काबीज केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसर्‍या बाजूला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने चार जागांवर विजय मिळवत मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोकणात महायुतीने मुसंडी मारली असून तळकोकणाात नारायण राणे यांनी 60 हजार मतांनी विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मावळते खासदार विनायक राऊत यांनी येथे राणेंना जोरदार लढत दिली. दुसर्‍या बाजूला रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे या लढतीत सुनील तटकरे यांनी 80 हजारांहून जास्त मताधिक्य घेत रायगडावर दुसर्‍यांदा कब्जा मिळवला. ही लढतही 'काँटे की टक्कर' मानली जात होती. शेतकरी कामगार पक्ष येथे अनंत गितेंसोबत असल्याने येथील लढतीत गीतेंची सरशी होईल, असे सांगितले जात होते. मात्र, मुस्लिम मताचा टक्का आपल्याकडे खेचण्यात सुनील तटकरे यांना यश आल्याने त्यांनी विजय मिळवला आहे.

कोकणात असलेल्या 6 लोकसभा जागांपैकी महायुतीने 5 जागा मिळवून महाराष्ट्रात पीछेहाट होत असताना कोकणात मोठी घोडदौड केली आहे. सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी केंद्रीय मंत्री राहिलेल्या कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीचे खाते कोकणात खोलले आहे. भिवंडीचा हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, कोकणात भाजपने सिंधुदुर्ग आणि पालघर या जागा मिळवत मोठे यशही मिळवले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला रायगडमध्ये सुनील ताटकरेंच्या रूपाने एकमेव विजय मिळाला आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेला कोकणात ठाणे आणि कल्याण या दोन जागांवर मोठा विजय मिळाला आहे.

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने मोठी मजल मारत चार जागांवर विजय मिळवला. कोकणात मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट झाली आहे. 2019 मध्ये शिवसेना अखंड असताना 18 जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने 10 जागांवर, तर शिंदेंच्या शिवसेनेने 6 जागांवर विजय मिळवला होता. दोन्ही शिवसेनेंना मिळून 16 जागा मिळवता आल्या आहेत. त्यामुळे शिवसेेना फुटीचा मोठा धक्का या पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडी राज्यात 28 जागांसह चांगले यश मिळवताना दिसत असताना ठाकरेंच्या शिवसेनेला काहीसे धक्के बसल्याचे चित्र आहे. विशेषतः कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खाते उघडता न आल्याने हाधक्का मानला जात आहे. तळकोकणातील नारायण राणेंच्या विजयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. येथे ठाकरे विरुद्ध राणे असा मोठा संघर्ष पाहायला मिळत होता. या संघर्षात राणेंनी सरशी मिळवली.

भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे विजयी

कोकणात पालघर आणि भिवंडीमध्ये तिरंगी चुरशीची लढत झाली. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कामडी या दुसर्या क्रमांकावर राहिल्या आहेत. हेमंत सावरा यांना 2 लाख 88 हजार, भारती कामडी यांना 2 लाख आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 1 लाख 14 हजार एवढी मते मिळाल्याने बहुजन विकास आघाडीने भाजपला मदत केल्याची शक्यता वाढली आहे. तर भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना मोठा धक्का देत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात सुरेश म्हात्रे यांना विजय मिळाला असून कपिल पाटील यांना मोठा धक्का बसला.

SCROLL FOR NEXT