Gandh Creation Akash Kandil first Indian brand:
दिवाळीच्या तोंडावर कोकणातील एका मराठमोळ्या तरुणाने चीनमधून आयात होणाऱ्या आकाश कंदिलांना तगडी टक्कर देण्यासाठी 'मेक इन इंडिया'चा एक यशस्वी आणि प्रेरणादायक ब्रँड उभा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूक येथील शेखर सावंत यांनी 'गंध क्रिएशन' या ट्रेडमार्कखाली भारतातील आकाश कंदिलाचा पहिला ब्रँड तयार केला आहे.
सावंत यांच्या या अभिनव उपक्रमामुळे 'गंध क्रिएशन'च्या आठ प्रकारच्या डिझाईन्सना अधिकृत ट्रेडमार्क मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे कंदील पूर्णपणे इको-फ्रेंडली, हँडमेड आणि फोल्डेबल आहेत, ज्यामुळे ते आकर्षक आणि बाजारात सहज उपलब्ध होणारे आहेत.
या उपक्रमामुळे देवरूक परिसरातील गरजू महिलांना मोठा आधार मिळाला आहे. सध्या 20 हून अधिक महिलांना या कंदील निर्मितीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या महिलांना हस्तकौशल्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय वाढवता येईल.
शेखर सावंत यांनी सांगितले की, "गेली १० वर्षे आम्ही कंदिलांच्या व्यवसायात होतो. चार वर्षांच्या सखोल संशोधनानंतर आम्हाला जाणवले की, 'मेक इन महाराष्ट्र'ची ही संकल्पना आपल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते." त्यांच्या या कलात्मक डिझाईन असलेल्या कंदिलांना मुंबईसह विविध शहरांतून मोठी मागणी आहे.
हा मराठमोळा ब्रँड केवळ चायना मेड कंदिलांना पर्याय देत नाही, तर भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची एक चांगली संकल्पना यशस्वी करत आहे.