कोकण

कणकवली : हायवे चौपदरीकरण; हत्ती गेला नि शेपूट राहिले!

backup backup

कणकवली; अजित सावंत : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निश्चितच गतीने झाले. आतापर्यंत जवळपास 99 टक्के काम पूर्णत्वास गेले असून काही सर्व्हिस रोड व काही किरकोळ कामे अपूर्ण आहेत, ती येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. तर खारेपाटण शुकनदीवरील चौपदरी पूल पुढील आठवड्यापासून वाहतुकीस खुला होणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची सद्यस्थिती पाहता 'हत्ती गेला नि शेपूट राहिले' अशी स्थिती आहे. मात्र, जूनपासून खर्‍याअर्थाने खारेपाटणपासून झाराप पर्यंतचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

सन 2017-2018 पासून सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरण कामास प्रारंभ झाला. खारेपाटण ते जानवली या टप्प्यातील सुमारे 40 कि.मी. चे काम केसीसी बिल्डकॉन या कंपनीला तर कणकवली ते झाराप या सुमारे 42 कि.मी. टप्प्यातील काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले होते. गेल्या साडेचार-पाच वर्षात सिंधुदुर्गातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गावरील अनेक ब्रिटिशकालीन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील जुने पूल पाडून त्या ठिकाणी नवे दोन लेनचे पूल उभारण्यात आले आहेत. विविध गावातील फाट्यांवर बॉक्सेल पूल उभारण्यात आले. कणकवली शहरामध्ये भव्य वायबीम पूल उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील सर्वच छोटे-मोठे पूल, बॉक्सेल आदी सर्व कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. केवळ खारेपाटणमधील शुकनदी पूलाचे काम बाकी होते, तेही आता पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या पूलाचे डांबरीकरणाचे काम सुरू असून पुढील आठवड्यापासून या पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे.

एकीकडे चौपदरीकरणाची बहुतांशी कामे पूर्णत्वास गेली असताना भूसंपादनातील तांत्रिक अडचणींमुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण, वारगांव, नांदगाव, कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सर्व्हिस रोडची कामे अद्याप अपूर्ण आहेत. तर वागदे-गडनदी पूलाजवळील सुमारे 200 मीटरमधील चौपदरीकरणाची एक लेन अपूर्ण आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने भूसंपादनाच्या 22 निवाड्यांना मंजुरी दिली होती. त्यामुळे भूसंपादनाच्या या कामाला आता गती मिळाली आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाने याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून भूमीराशी पोर्टलवर पेमेंटचे प्रस्ताव पाठवले आहेत. ते रत्नागिरीवरून नवी मुंबई आणि तेथून रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पुणे येथील पोर्टलवर जाणार आहेत. तेथून शहानिशा करून ऑनलाईन पद्धतीने संबंधित खातेदारांच्या खात्यावर पेमेंट जमा होणार आहे. वागदे येथील जमीन मालकांनाही पेमेंट बाबतच्या नोटिसा तलाठ्यांमार्फत पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

महामार्गावरील वागदे-गडनदी पूलाजवळील एका बाजूची लेन बंद असून त्या लेनचे काम अपूर्ण आहे. लवकरात लवकर लेन पूर्ण करून ती वाहतुकीस मोकळी करण्याची मागणी वागदे ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांच्याकडे केली आहे. तेथील भूधारकांना लवकरात लवकर मोबदला मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलाकडील एक लेन अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी हळवल फाट्यावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या लेनचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. तर कुडाळ तालुक्यातील घावनळे फाट्याजवळील सर्व्हिस रोडचे कामही अद्याप अपूर्ण आहे. याशिवाय काही मिडलकट, डायव्हर्शन अशी कामे प्रलंबित आहेत. मात्र, इतर बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. येत्या मे अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे महामार्ग प्राधिकरणचे प्रयत्न आहेत.

सर्व्हिस रोड व इतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने आता पावले उचलली आहेत. कणकवली तालुक्यातील एक-दोन निवाडे वगळता सर्व निवाडे मंजूर झाले आहेत. रायगड, रत्नागिरीमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. मात्र, सिंधुदुर्गात जवळपास काम पूर्ण झाल्याने जूनपासून खारेपाटण ते पात्रादेवीपर्यंत खर्‍याअर्थाने महामार्ग सुपरफास्ट होणार आहे.

खारेपाटणचा ब्रिटिशकालीन पूल कायम राहणार

खारेपाटण शुकनदीवरील शेकडो वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल तसाच ठेवला जाणार आहे. हा पूल अद्यापही वाहतुकीस सक्षम असा पूल आहे. जरी या पुलाच्या बाजूला महामार्ग चौपदरीकरणांतर्गत दोन लेनचा नवा पूल झाला तरी हा पूल कायम ठेवणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील महामार्गावरील इतर जीर्ण झालेले ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT