कोकण

सिंधुदुर्गची सुकन्या गौरी गोसावी लिटिल चॅम्पची महाविजेती

backup backup

मालवण; पुढारी वृत्तसेवा : झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय'सा रे ग म प' लिटिल चँप स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार 5 डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावची 12 वर्षीय सिंधुकन्या गौरी गोसावी हीने आपल्या सुरेल स्वरांनी आणि बहारदार सादरीकरणाने महाअंतिम फेरीत इतर स्पर्धकांवर मात करत महाराष्ट्राची महागायिका म्हणून या स्पर्धेचे महाविजेते पद पटकावले.

सध्या चारकोप-मुंबई येथे वास्तव्यास असलेली आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली (प) या शाळेची विद्यार्थिनी असलेल्या गौरीने सुरुवातीपासूनच एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत परीक्षकांसह रसिकांची मने जिंकत तब्बल 14 वेळा वरचा 'सा' मिळवत 14 गोल्डन तिकिटे मिळवली आणि दिमाखात महाअंतिम फेरीत दाखल झाली. अंतिम विजेतेपद मिळवत महाराष्ट्राची महागायिकाही बनली. या स्पर्धेचे परीक्षक रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन या महाराष्ट्राच्या लाडक्या पंचरत्नांनी नेहमीच गौरीच्या गायनाचे कौतुक केले.

तसेच सारेगमप मधील वाद्यवृंद आणि विशेष अतिथी परीक्षक म्हणून येणार्‍या दिग्गज गायक आणि कलाकारांनीही गौरीला भरभरून दाद दिली. यामध्ये संगीतक्षेत्रातील जागतिक पातळीवरील व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीतकार आणि गायिका उषा मंगेशकर यांनी तर चक्क गौरीच्या आवाजाची आणि गायनाची तुलना महागायिका आशा भोसले यांच्या सोबत केली आणि गौरीचे मनापासून कौतुक केले. गौरीला मिळालेली ही दाद तिचा उत्साह वाढवणारी आणि संस्मरणीय अशीच ठरली. गौरीचे वडील भूषण गोसावी हे मुंबई महानगर पालिकेत अभियंता आहेत तर आई भक्ती गोसावी या मुंबई -अंधेरी येथे विद्या विकास हायस्कूल मध्ये शिक्षिका आहेत.

गौरीचे यश समाजातील मुलांना प्रेरणादायी

रविवारी महाअंतिम फेरीत गौरी गोसावी महागायिका किताब जिंकल्याचे घोषित होताच मुंबईसह सिंधुदुर्गात सोशल मिडीयावर तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. सिंधुदुर्ग आणि मुंबईतील गोसावी समाजाच्या वतीने लिटिल चॅम्प गौरीचे अभिनंदन करताना नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी म्हणाले,य गौरीचा परफॉरर्मन्स सुरुवातीपासूनच चांगला झाला, तो पुढे बहरतच गेला.

त्यामुळे ती महागायिका होईल असे वाटतच होते आणि आज ती महागायिका झाली. आज गोसावी समाजाची सुकन्या गौरी गोसावी हिने इतिहास घडविला. आजचा दिवस हा गोसावी समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. गौरी गोसावी हीने स्वतःबरोबरच गोसावी समाजाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोचविले. 12 वर्षाच्या या कन्येचा संगीत क्षेत्रातील प्रवास कौतुकास्पद तर आहेच पण तो थक्क करणारा आणि समाजातील इतर मुलांना आणि कलाकारांना प्रेरणादायी आहे. समस्त गोसावी समाजाला ही गोष्ट निश्चितच भूषणावह व अभिमानास्पद आहे.

SCROLL FOR NEXT